गडहिंग्लजला उघडणार रोजगाराचे द्वार

गडहिंग्लजला उघडणार रोजगाराचे द्वार

gad114.jpg
89453
बड्याचीवाडी : येथील एमआयडीसीमध्ये १४ हून अधिक उद्योगांचे आगमन होणार असून, अनेक कंपन्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीला प्रारंभही केला आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------------------
गडहिंग्लजला उघडणार रोजगाराचे द्वार
एमआयडीसीत १४ उद्योगांचे आगमन : युवकांना संधी; बाजारपेठेच्या अर्थचक्राला मिळेल गती
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : तब्बल २५ वर्षांनंतर येथील औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) उद्योगचक्राला गती मिळण्याचे संकेत आहेत. दोन वर्षांत वस्त्रोद्योग, फौंड्री, कृषी, अल्कोहोल अशा क्षेत्रांतील १४ हून अधिक उद्योजकांनी सुमारे १२० एकर जागा घेऊन काही कारखान्यांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. यात सुमारे ४०० कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक होत आहे. परिणामी, वर्षभरात स्थानिक परिसरातील हजारो युवकांना रोजगाराचे नवे हक्काचे दालन खुले होणार आहे. साहजिकच स्थानिक बाजारपेठेचे अर्थचक्र वेगावणार आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी, औरनाळ, शेंद्री गावच्या हद्दीत एकूण १३२ हेक्टर क्षेत्रात १९९८ ला एमआयडीसीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण, उद्योगाअभावी दीड दशक केवळ एमआयडीसीच्या फलकापुरतेच अस्तित्व राहिले होते. दशकभरात पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे काही स्थानिकांनी धाडसाने उद्योग सुरू केले, तरीही संख्या तोकडी होती. मुख्यत्वेः ग्रॅमॅक्स उद्योगाने बहुतांश सर्वच जागा काबीज केल्याने नव्या उद्योगांच्या आगमनाला संधी नव्हती. पण, खूप वर्षे जागेचा वापरच न केल्याने ग्रॅमॅक्सचे भूखंड शासनाने परत घेतले.
लगतच्या कागल, कोल्हापूर एमआयडीसीही फुल्ल झाल्याने उद्योजकांनी मोर्चा गडहिंग्लजकडे वळविला आहे. खुल्या भूखंडांमुळे कोरोनानंतर हे चित्र बदलत चालले आहे. नव्या उद्योगाच्या उभारणीत आर.ए. डेनिम फॅब्रिक, जठार स्पिनिंग, माय स्मार्ट इंडूलिंक ॲग्रो कंपनी, बायोफ्युअल अल्कोहोल, वरेर वाईज पी. व्ही. सी. पाईप, आदी कंपन्यांचा समावेश आहे. तालुक्यातील हसुरचंपूचे मूळचे असणारे उद्योजक घाटगे कुटुंबीयांच्‍या घाटगे-पाटील फौंड्रीनेही येथे अधिक क्षेत्र घेतले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुंबई-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसीदेखील फुल्ल होत आहे. त्यामुळे भविष्यात सीमाभागात गडहिंग्लज हा उद्योजकांसमोर एकमेव चांगला पर्याय आहे. त्यासाठी महामार्गावरून जोडणारा मोठा रस्ता आणि पायाभूत सुविधा अधिक भक्कम करणे आवश्यक आहे. तूर्तास वर्षभरात उत्पादनाला सुरुवात होणाऱ्या नव्या उद्योगामुळे गडहिंग्लज एमआयडीसीतील उद्योग चक्राचा सूर्योदय होणार हे नक्की.
-------------------
दीड हजार रोजगार
मुळातच जिल्ह्याच्या एका टोकाला असणाऱ्या या तालुक्यात रोजगाराची उपलब्धता नसल्याने युवकांची कोंडी होत होती. त्यामुळे नोकऱ्यासाठी मुंबई, पुणे गाठावे लागते. एमआयडीसीतील नव्या उद्योगामुळे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा सुमारे दीड हजार युवकांना रोजगाराची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रत्यक्ष रोजगाराची ही संख्या असली तरी औद्योगिक वसाहतीच्या विकसितेमुळे अप्रत्यक्षपणे वाढणारा रोजगार मोठ्या प्रमाणात असेल.
----------------
विकासाला अजूनही वाव
एमआयडीसीच्या एकूण १३२ हेक्कटर क्षेत्रात २८१ भूखंड आहेत. त्यापैकी १२० भूखंड शिल्लक आहेत. सध्या २३ उद्योग कार्यरत आहेत. यात नव्याने पंधरांहून अधिक उद्योगांची भर पडली आहे. कोकण आणि गोव्याला लगत असणाऱ्या या परिसरामुळे मोठ्या उद्योगांना अधिक संधी आहे. गडहिंग्लज एमआयडीसी पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यास सुमारे पाच हजारांवर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे विकासाला अजूनही वाव असून, आणखीन मोठे उद्योग आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com