महामार्ग चकाचक, पण नागरिक अंधारात

महामार्ग चकाचक, पण नागरिक अंधारात

Published on

GAD34.JPG
94605
गडहिंग्लज ः पालिकेच्या हद्दीत शहरातील महामार्गावर बसवलेले पथदिवे अद्याप बंदच आहेत. (आशपाक किल्लेदार ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------------------------------
महामार्ग चकाचक; पण नागरिक अंधारात
संकेश्वर-बांदा महामार्ग : गडहिंग्लजसह नऊ गावच्या हद्दीतील पथदिवे बंदच
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः संकेश्वर-बांदा महामार्गावरील गडहिंग्लज, आजरा शहरासह नऊ गावच्या हद्दीत पथदिवे बसवले आहेत. परंतु, त्यांना अद्याप वीज जोडणी न दिल्याने या गावातील नागरिक अंधारातच आहेत. चकाचक झालेल्या महामार्गावरील नागरिकांची महिनाभरापासून सुरू असलेली ही गैरसोय कधी दूर होणार, असा संतप्त प्रश्‍न विचारला जात आहे. या पथदिव्यांचे वीज बिल कोणी भरायचे, या मुद्द्यावर वीज जोडणीचे काम रेंगाळल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर अधिक माहिती घेतली असता या पथदिव्यांचे वीजबिल कोणी भरायचे या मुद्द्यावर पथदिवे बंद असल्याचे सांगण्यात येते. गडहिंग्लज व आजरा शहरात ५० हून अधिक तर गिजवणेसारख्या मोठ्या गावच्या हद्दीत ३३ पथदिव्यांचे खांब बसले आहेत. छोट्या गावच्या हद्दीत ही संख्या कमी आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषद भरते. पालिका, नगरपंचायतीला शासन अनुदान देत असले तरी ती रक्कम अपुरी पडते. यामुळे या संस्थांना स्वतःच्या फंडातून बिले भरावी लागतात. परंतु उच्चदाबाचे पथदिवे बसवल्याने त्याचे बिलही पूर्वीपेक्षा दुपटीने येण्याची भीती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. यामुळे बिले कोणी भरायची, या वादात नागरिकांना मात्र अंधारातच वावरावे लागत आहे. वाहनधारक व पादचाऱ्यांना अंधारात चाचपडत जावे लागत असल्याने नागरिकांनी पालिका, ग्रामपंचायतीकडे पथदिवे सुरू करण्याबाबत तगादा लावला आहे.
---------
वीज जोडणीची प्रतीक्षा
-महामार्गालगत असणाऱ्या गाव आणि शहरांच्या हद्दीत उच्च दाबाचे पथदिवे
-दिव्यांनी गावे व शहरे उजळणार
-सर्व ठिकाणी खांब उभारून त्याच्या वायरिंगचे कामही पूर्ण
-महिनाभरापासून पथदिव्यांना वीज जोडणी नाही.
-महामार्गावरच अंधारामुळे नागरिकांची गैरसोय
------------
एकमेकांकडे बोट
अधिक वीजबिलाचा भार परवडण्यासारखे नसल्याने पथदिव्यांचे वीजबिल महामार्ग प्राधिकरणानेच भरायला हवा असे मत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहे. परंतु महामार्ग प्राधीकरणाने केवळ देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आपल्याकडे असून वीज बिल संबंधित पालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींनीच भरायची असल्याचे कळवले आहे. या दोन्ही विभागांकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे.
-------------
याठिकाणी बसवले पथदिवे
गडहिंग्लज नगपालिकेसह अत्याळ, गिजवणे, दुंडगे, हेब्बाळ कसबा नूल, मुत्नाळ (ता. गडहिंग्लज), आजरा नगरपंचायतीसह खोराटवाडी, गवसे या महामार्गालगत असलेल्या गावच्या हद्दीत पथदिव्यांचे खांब नव्याने बसवले आहेत. सर्व शहरे व गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना महामार्ग प्राधिकरणाने वीज जोडणीसाठी महावितरणकडे मीटरची मागणी करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापी एकाही संस्थेने याची कार्यवाही केली नसल्याचे सांगण्यात येते.
--------------
पालिकेने रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला आहे. यामुळे पथदिव्यांचे खांबसुद्धा त्यांच्या मालकीचे झाले. परिणामी ज्यावर पालिकेची मालकी नाही, त्याचे वीजबिल भरण्याचे अधिकार पालिकेला नाहीत. ऑडिटमध्ये हा मुद्दा येतो. यामुळे प्राधिकरणाने हे बिल भरण्याची गरज आहे. पथदिव्यांअभावी होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीला प्राधिकरण जबाबदार राहील.
- संजय गायकवाड, मुख्याधिकारी गडहिंग्लज पालिका
---------------------------------------
बांदा महामार्गावर पथदिव्यांची खांब उभारणी, त्याच्या वाहिनींची जोडणी पूर्ण केली आहे. मीटर घेणे व बील भरणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे. देखभाल दुरूस्ती प्राधीकरण करणार आहे. यामध्ये काही शंका असेल तर संबंधितांनी सांगली जिल्ह्यात केलेल्या कामांची माहिती घ्यावी. मीटर घेवून जोडणी घेईपर्यंत होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीला संबंधित संस्थाच जबाबदार राहील.
- अनिल पाटील, कनिष्ठ अभियंता, महामार्ग प्राधीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.