एजंटांमुळे बहिणींना आर्थिक फटका

एजंटांमुळे बहिणींना आर्थिक फटका

Published on

एजंटांमुळे बहिणींना आर्थिक फटका
मुख्यमंत्र्यांकडून दाखल्याची अट शिथिल ः जलद मिळण्यासाठी दिले होते जादा पैसे
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी १ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. योजनेस पात्र होण्यासाठी महिला कागदपत्रे जमा करत आहेत. जलद दाखले देण्याचे आमिष दाखवत काही एजंटांनी स्वतंत्र रेट कार्ड तयार केले होते. महिलांनीही दाखले जलद मिळण्यासाठी अधिक पैसे दिले आहेत. मात्र २ जुलैला मुख्यमंत्र्यांनी दाखल्यांची अट शिथिल केल्याने एजंटांचा खोळंबा झाला आहे. सुरुवातीला अधिक रक्कम देऊन अडकल्याने लाडक्या बहिणीस आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमधून २१ ते ६५ वर्षे वयोगटांतील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार पात्र महिलांना दरमहिना १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. याचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महिला या योजनेसाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी महा- ई सेवा केंद्र, सीएससी केंद्र, सेतू, तलाठी, तहसील कार्यालयामध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयात दररोज सुमारे ६०० ते ७०० दाखल्यांसाठी अर्ज येत आहेत. परिणामी कार्यालयाकडून दाखले मिळण्यास काहीसा विलंब होत आहे. याचा फायदा काही एजंट घेत आहेत.
दोन दिवसांत सुमारे तीन हजार अर्ज दाखल्यासाठी दाखल केले आहेत. काही एजंट जात प्रमाणपत्र, मूळ निवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला जलद मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाखल्यासाठी ५०० ते ७०० रुपये घेत असल्याचे दिसून येत होते. तर पूर्ण योजना मंजूर करून देतो असे सांगत काहींनी रेट कार्ड तयार केले आहे. त्यामध्ये एक ते दीड हजार रुपयांची मागणी होत होती. अनेक महिलांनी एजंटाना पूर्ण रक्कमही दिली आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी निर्माण केलेल्या या योजनेस पात्र होण्यासाठी महिलांना आर्थिक आधार शोधावा लागल्याचे चित्र दिसून आले.
-----------------------
योजनेच्या पार्श्‍वभूमीवर एजंटाचे रेट कार्ड
दाखले *दर*
जातीचा दाखला*७०० ते १०००*
उत्पनाचा दाखला*३०० ते ४००*
रहिवासी दाखला*५०० ते ७००*
-------------------------------
महिलांनी एजंटांच्या भूलथापांना बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये. काही समस्या असेल तर महा-ई सेवा केंद्र किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
-सुनील शेरखाने, अपर तहसीलदार, इचलकरंजी
------------------
३३.६० पैशांमध्ये एक दाखला
इचलकरंजी शहरात महा-ई सेवा केंद्रामधून सर्व दाखल्यांची टोकन प्रक्रिया होत असते. शासनाने एका दाखल्यासाठी ३३.६० पैसे दर निश्चित केला आहे. या दरप्रमाणेच रक्कम महिलांनी केंद्रचालकांना द्यावी. त्यापेक्षा जादा पैसे देऊ नयेत असे आवाहन अपर तहसीलदार कार्यालयामार्फत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.