यंत्रमाग उद्योगाला मिळणार उभारी

यंत्रमाग उद्योगाला मिळणार उभारी

Published on

यंत्रमाग उद्योगाला मिळणार उभारी
अतिरिक्त वीज सवलतीसाठी नोंदणीचा अडथळा दूर : आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा

पंडित कोंडेकर : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : अत्यंत प्रतिकूल परिस्‍थितीतून जात असलेल्या राज्यातील यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळाल्यानंतर मोठी उभारी मिळणार आहे. या लाभातील अडथळा ठरत असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द झाली आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण, यापूर्वीचा शासनाच्या निर्णयाचा अनुभव पाहता प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा यंत्रमागधारकांना लागली आहे. यामध्ये निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने होणार काय, याकडेही यंत्रमागधारकांचे लक्ष लागले आहे.
महायुती शासनाने राज्यातील २७ एचपीवरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७ एचपीखालील यंत्रमागधारकांना एक रुपया अतिरिक्त सवलत देण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ मार्च रोजी इचलकरंजी दौऱ्यावेळी केली होती. त्यानंतर चार दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेत अध्यादेश काढला होता. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी उद्योगाची ऑनलाईन नोंदणीची अट अनिवार्य केली होती. मात्र, त्यासाठीची किचकट प्रक्रिया पाहता याचा फारसा लाभ यंत्रमागधारकांना मिळणार नव्हता. त्यामुळे ही अट रद्द करण्याची एकमुखी मागणी होत होती. त्यासाठी राजकीय पाठपुरावाही सुरू होता. लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळीही हाच मुद्दा चर्चेत राहिला होता.
आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेतील चर्चेत याकडे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही अट रद्द करण्याची सूचना वस्रोद्योग सचिव वीरेंद्रसिंह यांनी केली आहे. यामुळे यंत्रमागधारकांना दिलासा मिळणार असला तरी त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सोपी नसल्याचे वस्रोद्योगातील जाणकारांचे मत आहे. याबाबत शासन पातळीवरून तातडीने कार्यवाही झाली तरच पुढील वीज बिलातून अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे. मुळात या सवलतीची घोषणा मार्चमध्ये झाली होती. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी होणार की अट रद्द केल्याच्या निर्णयापासून होणार, याबाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे.
...
पहिला लाभ, नंतरच अभिनंदन
यापूर्वी वीज दर सवलतीची घोषणा अनेकवेळा झाली. पण, त्यांची विविध कारणांनी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांचा शासनाच्या घोषणेवर विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे अट रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे अपेक्षित स्वागत झाले नाही. प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतर शासनाचे अभिनंदन केले जाईल, अशा सर्वसाधारण प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटल्या आहेत.
...
इचलकरंजीतील १०५०० ग्राहकांना लाभ
इचलकरंजी शहर व परिसरातील १०५०० यंत्रमागधारक ग्राहकांना अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २७ एचपीखालील ७५००, तर २७ एचपीवरील ३००० ग्राहक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ४५ हजार यंत्रमाग ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.
...
‘अतिरिक्त वीज सवलतीची घोषणा मार्च महिन्यात झाली होती. या कालावधीपासून ही सवलत मिळाली पाहिजे. त्याचा मिळणारा फरक येत्या वीज बिलातून कमी करून मिळाला पाहिजे.
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना
...
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल करण्याचा इचलकरंजीत शब्द दिला होता. तो शब्द पाळल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. येणाऱ्या वीज बिलातून यंत्रमागधारकांना फरकासह सवलत द्यावी.
- अशोक स्वामी, अध्यक्ष, वस्रोद्योग महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.