डेंगीचा जोर वाढला

डेंगीचा जोर वाढला

डेंगीचे चार दिवसांत १३ डेंगीचे रुग्ण
दक्षता हवी; डासअळ्या सापडलेल्या घरांच्या संख्येत वाढ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः शिडकावा केल्यासारखा पडणारा पाऊस व त्यानंतर मिळणारी उघडीप हा प्रकार शहरात डेंगीच्या डासांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. चार दिवसांत १३ रुग्ण आढळले असून चिकुनगुणियाचेही पाच रुग्ण आढळले. आज दिवसभरात केलेल्या पाहणीत विविध भागांतील १२३ घरांत डासअळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे ही स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांनीच दक्षता घेण्याची वेळ आली आहे.
शासकीय प्रयोगशाळेत रक्त तपासणीला पाठवलेल्या नमुन्यांमधील ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय खासगी प्रयोगशाळेतून होत असलेल्या निदानाची आकडेवारी त्यापेक्षा जास्त आहे. ते निदान सरकारी पातळीवर ग्राह्य मानले जात नाही; पण तापाच्या रुग्णांचे प्रमाण शहरात वाढताना दिसत आहे. गेल्या महिन्यात ४९ डेंगीचे रुग्ण आढळले होते. जुलैच्या पहिल्या चारच दिवसांत १३ रुग्ण आढळले असून चिकुनगुणियाचेही रुग्ण आढळले आहेत. त्यातून डासांच्या माध्यमातून पसरत असलेल्या साथ रोगाची अवस्था गंभीर होत चालली आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा घराघरांत जाऊन तपासणी करत आहेत.
आज ३४४३ घरांची तपासणी केल्यानंतर त्यातील १२३ घरांत डासांच्या अळ्या आढळल्या. १३८ भांड्यांमध्ये अळ्या सापडल्या. तिथे औषध टाकण्यात आले; पण त्याशिवाय विविध भागांत टायर दुकाने, बेसमेंट तसेच अर्धवट असलेल्या बांधकामांची तपासणी केली जात आहे. जिथे पाणी साठलेले साहित्य आढळते ते जप्त केले जात आहे. बेसमेंटमध्ये साठलेल्या पाण्यात औषध टाकण्यात आले.
----------------
चौकट
आरोग्य विभाग सतर्क
ठिकठिकाणी सापडत असलेल्या डास अळ्यांमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांना आपापल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेल्या ठिकाणी जळके ऑईल टाकण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच औषध फवारणीवर भर दिला जात आहे. नागरिकांनी परिसरात पाणी साठू देऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com