खंडपीठ

खंडपीठ

95243
०००००००००००००००००

वकील परिषदेत ठरणार भूमिका
खंडपीठ कृती समितीचा ठराव; आंदोलन सुरूच राहणार, परिषद १५ ऑगस्ट पूर्वी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः संघटन मजबूत करणे, खंडपीठ कृती समितीकडून पंधरा ऑगस्टपूर्वी सहा जिल्ह्यांतील वकील परिषद घेऊन सर्किट बेंचच्या आंदोलनाची दिशा ठरवणे, कनिष्ठ वकिलांसाठी विद्यावेतन देण्यासाठी मुख्‍यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्षच खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक राहतील, असे ठराव आज खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्यायसंकुलात सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेली बैठक रात्री दहाच्या सुमारास संपली. यामध्ये माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह जिल्ह्यातील, तालुक्यांतील वकिलांनी त्यांची भूमिका व्यक्त केली. ‘करो या मरो’ असे आंदोलन करूया, मानपान बाजूला ठेवून खंडपीठासाठी एकत्रित काम करूया, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाऊन आंदोलन करूया, काळ्या फिती लावून काम करूया, प्रतिकात्मक दिंडी काढून मुख्यमंत्र्यांना भेटूया, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवूया, प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना भेटून मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची भेट घडविण्यासाठी दबाव आणूया, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ज्युनिअर वकिलांना स्टायपेंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवूया, मोर्चे,धरणे, उपोषण करूया, अशा भावना सहा जिल्ह्यांतील वकिलांनी बैठकीत मांडल्या. आता आंदोलन थांबवू नका, मरगळ येऊ देऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत; जो काय निर्णय घ्याल त्याला पाठिंबा असेल, अशी भूमिका सोलापूर, सांगली, कऱ्हाड, सातारा, कोल्हापूर येथील वकिलांनी स्पष्ट केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जाहीर कार्यक्रम असल्यामुळे तुमच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे दोन्ही जिल्ह्यांतून कळविण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य वसंतराव भोसले यांनी मानापमान बाजूला ठेवून खंडपीठासाठी काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. खंडपीठाचा लढा ताकदीने लढला पाहिजे. त्यासाठी तालुका, जिल्हा पातळीवर मोट बांधली पाहिजे, संघटन मजबूत केले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ॲड. शिवाजीराव राणे यांनी कनिष्ठ वकिलांना इतर राज्यांप्रमाणे स्टायपेंड देण्याबाबतचा ठरावा मांडला. सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा, असे सुचविले.
ज्येष्ठ वकील संभाजीराव मोहिते, सातारा बारचे अध्यक्ष विकास पाटील, डी. एम. जगताप, आर. बी. चव्हाण, एम. टी. देसाई, बाळासाहेब गायकवाड, सचिन जाधव, प्रमोद पाटील, मिलिंद पाटील, डी. बी. पाटील, तात्यासाहेब पाटील, किरण देशमुख, दिलीप पाटील, भाऊसाहेब पोवार, गिरीश खडके यांच्यासह तालुका, जिल्हा पातळीवरील वकिलांनी त्यांची भूमिका मांडली. जिल्हा बारचे उपाध्यक्ष शशिकांत पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. रणजित गावडे यांनी आभार मानले.

दोन्ही खासदार छत्रपतींनी पुढाकार घ्यावा ः तानाजी नलवडे
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे म्हणाले, ‘‘कोल्हापुरात थेट खंडपीठ द्यावे, अशी मागणी सातारा आणि कोल्हापूर येथील दोन्ही खासदार छत्रपतींनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून केली पाहिजे. ते, त्यांचा शब्द डावलणार नाहीत. कारण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केवळ मोदी आणि शहांचेच ऐकतात. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ ते म्हणाले, ‘‘याचसोबत पक्षकारांना सोबत घेऊन ताबडतोब आंदोलन सुरू करू. काळ्या फिती लावून काम सुरू ठेवू. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयावर मोर्चे काढू, आवश्‍यकता भासलीच तर काहींनी सुचविल्याप्रमाणे गाडीवरील वकिलांच्या स्टिकर काढून थेट मंत्रालयावर धडक मारू.’’

या प्रश्नी पुन्हा पूर्वीसारखे सर्वपक्षीय आमदार, खासदारांना एकत्रित करुया. मुख्यमंत्र्यांशी भेट देण्याबाबतची मागणी आमदार सतेज पाटील यांना उद्याच भेटून करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलनाचे आणि मुख्य न्यायमूर्तींशी त्यांची भेट कशी महत्त्वाची आहे, हे समजून सांगू, असे मत ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे यांनी व्यक्त केले.

चौकट
आंदोलनात राजकारण चुकीचे ः श्रीकांत जाधव
तुमची भांडणे तुम्ही मिटवा, त्याचा परिणाम खंडपीठ लढ्यावर होऊ देऊ नका. कोल्हापूर बार असोसिएशनचा अध्यक्षच खंडपीठ कृती समितीची निमंत्रक असला पाहिजे, असाही ठराव पुन्हा करून घ्या. काहींनी चुकीचा निर्णय घेऊन आज खंडपीठ आंदोलनात कोल्हापूर बार असोसिएशनचे राजकरण आणले, हे चुकीचे आहे. सर्वांना मानसन्मान द्या. सर्वांना सोबत घेऊन जा, असे मत ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव (सांगली) यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com