विशाळगड बैठक

विशाळगड बैठक

फोटो ः 95463

अतिक्रमणविरोधात विशाळगडावर शनिवारी धडक
संभाजीराजे छत्रपती ः शासकीय विश्रामगृहात बैठक; कोणा धर्माच्या विरोधात नव्हे, न्यायाचा लढा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात १३ जुलैला थेट गडावर धडक देणार आहे. रायगडावरील राजसदरेवरून बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे बघायचे आहे. हा कोणा धर्माच्या विरोधात लढा नाही. अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा असून, शिवभक्त म्हणून गडावर जाणारच, असा पवित्रा संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे घेतला. विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणविरोधात आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, या वेळी संभाजीराजे यांच्या भूमिकेमागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही शिवभक्तांनी दिली.
संभाजीराजे म्हणाले, ‘सोशल मीडियातून अतिक्रमणावर मी का बोलत नाही, अशी विचारणा होऊ लागली. लॉस एंजेलिसला शिवराज्याभिषेक सोहळ्याला गेल्याने परतल्यानंतर यात लक्ष घालायचे ठरवले होते. सरकारच्या हातात अतिक्रमणाची माहिती असताना दीड वर्षात त्यांनी काय केले? किती वेळा वकील न्यायालयात गेले? अतिक्रमण हे गडावरील संकट असून, त्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काय केले, याचा जाब विचारण्यासाठी गडावर जाणार आहे. पोलिसांची भीती दाखवली तरी आम्ही घाबरणारे नाही. सांगून काही करणार नाही.’
ते म्हणाले, ‘शिवछत्रपतींचे सुरुवातीला राजगड व त्यानंतर रायगड राजधानीचे किल्ले होते. छत्रपती ताराराणींच्या काळात विशाळगडाला राजधानी इतकेच महत्त्व होते. औरंगजेबाविरुद्ध लढा देताना हा किल्ला महत्त्वपूर्ण ठरला. शिवाय ताराराणीपुत्र पहिले शिवाजी यांचा राज्याभिषेक सोहळा याच गडावर झाला. शिव-शाहूंचा वंशज म्हणून दीड वर्षांपूर्वी गडावर भेट दिल्यानंतर तिथल्या अतिक्रमणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या वेळी महाशिवरात्रीपूर्वी अतिक्रमण काढण्यात येईल, असे सांगितले. अडीच महिने त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली. पुन्हा न्यायालयातून तात्पुरती स्थगिती आली.’
हिंदी शिवचरित्रकार डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, ‘हा सुरक्षित किल्ला असून, इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पन्हाळ्यावरून सुटका करून विशाळगडाला जाताना शिवरायांना सुर्वे-मोरे यांच्याशी झटापट करून गडावर जावे लागले होते. सुर्वे यांनी गडाच्या परिसरातील जंगलात पहिला गनिमी कावा करून आदिलशहाचा पराभव केला होता. राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अंबिकाबाई याच गडावर सती गेल्या होत्या.’
प्रा. डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, ‘ताराराणी यांनी किल्ला कसा लढवावा, याची पत्रे सरदारांना दिली होती. औरंगजेबाला झुंजवणारा हा किल्ला आहे. त्यावर एखादा हॉलीवूडपट निघू शकेल, इतकी त्याची महती आहे. तो ज्वलंत इतिहासाचे प्रतीक असून, इतिहास धर्म मानून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.’
संजय पोवार म्हणाले, ‘अतिक्रमणे हटविणे म्हणजे कोणत्या धर्माविरोधी कृती नाही. गडाचे पावित्र्य जपताना तेथील रहिवाशांचे राहणीमान उंचावणे आवश्‍यक आहे. त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.’ रूपेश पाटील यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेमागे ठामपणे राहण्याची, तर विजय ससे यांनी गडाचा आराखडा तयार करणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. हेमंत साळोखे, विनोद साळोखे, अमित मरळीकर, संदीप सावंत, गीता हसूरकर यांनी मते मांडली. विनायक फाळके, फत्तेसिंह सावंत, सुहास पाटील, पंडित पोवार उपस्थित होते.
--
चौकट
बालेकिल्ल्याचे घडीव दगड गेले कोठे..?
गजापूरमधील आबा वेल्हाळ यांनी अतिक्रमण जमीनदोस्त करावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, ‘पन्नास-साठ वर्षांपूर्वी गडावर बारा घरे व १०५ लोक राहत होते. त्यानंतर गडावर ८३ अतिक्रमणे झाली. त्याला पुरातत्त्व खाते जबाबदार आहे. बालेकिल्ल्याचे घडीव दगड गेले कोठे? आम्हाला आदेश दिला तर एका महिन्यात त्याचा छडा लावतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com