हिरण्यकेशीवरील पुल लालफितीत

हिरण्यकेशीवरील पुल लालफितीत

Published on

ajr75....
95381
साळगाव (ता. आजरा) ः येथील साळगाव बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला आहे. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
----------------------
हिरण्यकेशीवरील पूल लालफितीत
साळगाव बंधारा पाण्याखाली : प्रवाशांना पंधरा किमीचा फेरा
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ७ : साळगाव येथील हिरण्यकेशी नदीवर पुलासाठी २०१७ -१८ च्या अर्थसंकल्पात तीन कोटी ६० लाखांची तरतूद केली होती. भूसंपादन व अन्य कारणांमुळे हा पूल सहा वर्षे लालफितीमध्ये अडकला आहे. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्यावर या पुलाची जनतेत केवळ चर्चा होते. याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. योग्य तो पाठपुरावा होत नसल्याने याबाबत हालचाली दिसत नाहीत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिक, प्रवाशांना सोहाळे मार्गे आजऱ्याला जाण्यासाठी पंधरा किलोमीटरचा फेरा नशिबी आला आहे.
हिरण्यकेशी नदीवर १९६७ मध्ये साळगाव बंधारा उभारला. यामुळे पेरणोली पंचक्रोशीतील गावे, भुदरगडच्या पश्‍चिम भागातील गावांचा आजऱ्यांशी संपर्क सुरू झाला. हा बंधारा साडेतीन मीटर उंचीचा आहे. हिरण्यकेशी नदीला पूर आल्यावर तो पाण्याखाली जातो. या आठवड्यात तो दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सोहाळे मार्गे वाहतूक वळवली आहे. सोहाळे मार्गे पंधरा किलोमीटरचा फेरा पडत असल्याने शासकीय कामांसाठी आजऱ्याला जाणारे नागरिक, प्रवासी, नोकरदार, रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे साळगाव येथील हिरण्यकेशी नदीवर पूल उभारणे महत्त्‍वाचे आहे. पुलासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केले व निधीची तरतूद केली. भूसंपादन व काही तांत्रिक बाबीमुळे पूल रखडला. दरम्यान, भूसंपादनाचा प्रश्न बहुतांशी मार्गी लागला आहे. पण प्रस्तावाची फाईल योग्य त्या पाठपुराव्याअभावी पुढे सरकत नसल्याचे समजते. पेरणोलीसह पश्‍चिम भुदरगडातील सुमारे २१ गावांना जोडणारा हा पूल आहे. गारगोटी व आजऱ्याचे अंतर कमी होते व वेळचीही बचत होते. पावसाळ्यात पूर आल्यानंतर साळगाव बंधारा पाण्याखाली जातो व पुलाबाबत चर्चा सुरू होते. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
----------
दृष्‍टिक्षेप
पुलासाठी तीन कोटी ६० लाखांची तरतूद आहे. पुलाची उंची अकरा मीटर व रुंदी सात मीटर आहे. भुदरगड व आजरा या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्‍वपूर्ण पूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.