तुटलेल्या विद्युत तारा बेततात जीवावर

तुटलेल्या विद्युत तारा बेततात जीवावर

तुटलेल्या विद्युत तारा अनेकांच्या जीवावर
जिल्ह्यात आठवड्यात चार घटना : तिघांचा मृत्यू; दोन जखमी; महावितरणकडून पुरेशी दक्षता नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : तुटलेल्या विद्युत तारा अनेकांच्या जीवावर बेतल्या आहेत. जिल्ह्यात आठवड्यात तिघांना जीव गमवावा लागला तर दोघे जखमी आहेत. या घटना वारंवार का होत आहेत, त्यावर उपाय काय? याबाबत जनजागृती कमी आहे. वीज वितरण कंपनीकडून ही दक्षता घेतली जाते. मात्र, ती पुरेशी नाही. परिणामी, पावसाळ्यातील एक एक जीव धोक्यात जात आहे. नुकताच शाहूवाडी येथे दोन उमदे सख्खे भाऊ एकाच वेळी तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने मृत झाले. त्यांच्या धक्क्याने आज त्यांच्‍या आईचेही निधन झाले. घडलेल्या घटना दुर्दैवी असल्या तरीही पुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून उपायही झाले पाहिजेत.
सध्या वीज कंपनीकडे असलेल्या विद्युत तारांचे जाळे खूप जुने आहे. ज्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे तेथे त्या बदलण्याचे काम केले जाते. आवश्‍यक त्या ठिकाणी त्याचा धोका होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जातात. तरीही विद्युत तारा तुटतात. विशेष करून पावसाळ्यात या घटना अधिक घडतात. एखाद्या तुटलेल्या तारेमुळे एखाद्या कुटुंबातील प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्याच्‍या कुटुंबावर जगण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे एक घटना अख्ख कुटुंब उद्‍ध्‍वस्‍त करते. त्यामुळे या घटना खूप गांभीर्याने घेणे आवश्‍यक आहे.

चौकट
का तुटतात विद्युत तारा?
विद्युत तारांचे जाळे खूप जुने आहे. प्रत्येक ठिकाणी तारा तुटून खाली पडू नयेत यासाठी उपाययोजना केलेल्या असतात. तसेच तुटलेली तार जमिनीला स्पर्श होताच त्याचा विद्युत पुरवठा बंद पडतो. तुटलेली तार थेट खाली पडू नये, यासाठी ठिकठिकाणी त्याला अडक केलेली असते. प्रेसर असतात. मात्र, पावसाळ्यात विद्युत तारा तुटण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ग्राहकांनी विद्युत तारांच्या ठिकाणी जाताना सावध राहावे, असेही आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.

चौकट
नुकसान भरपाईचे काय?
विद्युत तारेला स्पर्श होऊन एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याची चौकशी होते. महावितरण कंपनीशी कोणत्याही बाबतीत सलग्न नसलेल्या इलेक्ट्रिक निरीक्षकांकडून त्याची सखोल चौकशी होते. झालेल्या मृत्यूस महावितरण कंपनी कारणीभूत असल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्‍चित केली जाते. ही चौकशी झाल्यानंतर नुकसान भरपाईबाबत निर्णय होतो.

चौकट
आठवड्यात घडलेल्या घटना
०) ३ जुलै - कोपार्डे (ता. शाहूवाडी) - सुहास व स्वप्नील कृष्णा पाटील या दोन सख्या भावांचा मृत्यू
०) ७ जुलै - सुहास आणि स्‍वप्नील या दोन्ही मुलांच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही मृत्यू
०) ५ जुलै - नागाव (ता. हातकणंगले) - शेतकरी सुनील बापू शिंदे उच्चदाब विद्युत वाहनी अचानक तुटून अंगावर पडल्याने मृत्यू
०) ५ जुलै - गडमुडशिंगी (करवीर) व इचलकरंजी (ता.हातकणंगले) येथे एक लहान मुलगी व शेतकरी विद्युत वाहिनीच्या धक्क्याने जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com