तरुणांचे सर्प पकडण्याचे धाडस जिवावर बेतणारे

तरुणांचे सर्प पकडण्याचे धाडस जिवावर बेतणारे

Published on

ich151.jpg
97290
इचलकरंजी : शेळके मळा येथे घोणस जातीच्या विषारी सर्पाचे पिल्ले आढळून आले.
------------------
तरुणांचे सर्प पकडण्याचे धाडस जिवावर बेतणारे
व्हिडीओ पाहून प्रयत्न ः अनुभवाची कमतरता, सर्प प्रजातींच्या माहितीअभावी धोका
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ : संभाव्य पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यासोबत मानवी वस्तीत येणाऱ्‍या सर्प, विंचू, रानमांजर यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा प्रयत्न करीत असते. यामध्ये खासकरून सर्पमित्र महत्वाची भूमिका निभावत असतात. सध्या मात्र सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून सर्प पकडणाऱ्‍या सर्पमित्रांची संख्या वाढली आहे. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता, सर्प प्रजातींच्या महितीचा अभाव असल्याने सर्प दंश होण्याचा धोक्यात वाढला जात आहे. परिणामी तरुणांचे सर्प पकडण्याचे धाडस जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण होत आहे.
पावसाळ्यात पुराचे पाणी शेतामध्ये शिरत असल्याने सर्प सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येत असतात. अशावेळी नागरिकांना व सर्पांना सुरक्षित ठेवण्याचे काम सर्प मित्र करीत असतात. सर्प विषारी असो किंवा बिनविषारी नुसता दिसला तरी भीतीने गर्भगळीत होतात. त्यामुळे सर्प दिसला की नागरिक कोणताही विचार न करता मारण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे सर्पाना मारणाऱ्‍यांची संख्या अधिक असताना काही संघटना, सर्प मित्र त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ते पुर कालावधीत मानवी वस्तीमध्ये आलेल्या सर्पांना पकडून सुरक्षित स्थळी नेण्याचे काम करीत आहेत.
सर्प पकडण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा सर्पमित्रांनाही दंश होत असतो. अशावेळी सर्पमित्रांचा अनुभव, सर्पांबाबत असलेली माहिती उपयोगी पडते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता कमी होते. मात्र सध्या तरुण सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून मानवी वस्तीमध्ये आलेले सर्प पकडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना हा सर्प विषारी की बिनविषारी हे ही माहीत नसते. त्यामुळे परिस्थिती धोकादायक बनते. सर्प पकडण्याच्या प्रयत्नात दंश झाल्यास घाबरून परिस्थिती आणखी गंभीर करतात. त्यामुळे प्रशिक्षित सर्प मित्रांच्या उपस्थितीत सर्प पकडणे सुरक्षित ठरते. सर्व सामान्य नागरिकांसोबत नव्याने सर्प पकडणाऱ्यांना प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
--------------------------
तरुणांकडून खबरदारी आवश्यक
शहरातील आयजीएम रुग्णालयात सर्प दंशावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र काही वेळा सर्जनची आवश्यकता भासत असल्याने रुग्णांना कोल्हापूर, सांगली येथे पाठवण्यात येते. तर येथील खासगी रुग्णालयात सर्प दंशावर उपचार घेण्यास सुमारे एक ते दीड लाख खर्च येत असल्याचे सर्पमित्र सांगतात. त्यामुळे तरुणांनी सर्प पकडताना आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक ठरते.
--------------------
पावसाळ्यात घोणस जातीच्या विषारी सर्पाची पिल्ली अधिक दिसून येतात. ही बिनविषारी अजगरासारखी दिसत असल्याने नागरिक आवश्यक खबरदारी घेत नाहीत. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्पांबाबत माहिती असणाऱ्‍यांनी सर्प पकडण्याचे धाडस करावे.
-शेखर पोवार, प्राणिमित्र, वन्यजीव संरक्षण संस्था
----------
*आपल्या भागात आढळणारे साप
*बिनविषारी - धामण, तस्कर, गवत्या, विरूळा, कवड्या, नानेटी, कुकरी
*निमविषारी - हरळटोळ
*विषारी - नाग, घोणस, मण्यार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com