

आवेशपूर्ण, रुबाबदार... विजयी मुद्रा
...
लीड...
मालवणातील सिंधुदुर्गाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला आणि एकूणच पुतळे व स्मारकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रातिनिधिक पुतळ्यांची वैशिष्ट्ये, ही शिल्पे साकारताना ऊन-वारा-पाऊस या साऱ्या गोष्टींचा केलेला विविधांगी अभ्यास आणि त्यांचे जतन व संवर्धन अशा अनुषंगाने घेतलेला हा धांडोळा...
...
7330
पंचधातू माध्यमातील
आवेशपूर्ण छत्रपती शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली विल्सन यांचा पुतळा उभारला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा भाग म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावर डांबर फेकून तो विद्रूप केला. शेवटी हा पुतळा काढून टाकण्यात आला. त्याच ठिकाणी अल्पावधीतच चित्रपतपस्वी भालजी पेंढारकर आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पंचधातूच्या हजारो वर्षे टिकणाऱ्या माध्यमात महाराजांचा पुतळा साकारला आणि १३ मे १९४३ रोजी त्याची प्रतिष्ठापना केली.
म्यानातून काढलेली तलवार, पाठीला ढाल, उजवा पाय पुढे टाकत, वाऱ्याच्या वेगाने उडालेली बाराबंदी, अशी गतिमान रचना, शिवरायांची तुफानी कारकीर्द आपल्या नजरेसमोर उभी करते. पाठीला असणारी ढाल, हातातील मराठा वक्र तलवार बारकाव्यांसह बाबूराव पेंटर यांनी दाखवली आहे. शिवरायांची तीक्ष्ण नजर, डोळ्यांतील वीरश्री भाव, पुढे टाकलेला उजवा पाय, याची रचना इतकी अचूक आहे की, महाराजांचा आवेश पाहत असताना आपण थोडे थबकतो.
...
07334
चित्तथरारक रचना
शिवाजी विद्यापीठातील शिल्प
कोल्हापुरातील छत्रपती शिवरायांचा सर्वांत मोठा पुतळा कोणता असेल तर तो शिवाजी विद्यापीठात असणारा अश्वारूढ पुतळा. साधारण १५ ते १६ फूट उंचीचा असा हा पुतळा अत्यंत आवेशपूर्ण आणि अश्वाच्या गतीवरील महाराजांचे पूर्ण नियंत्रण दर्शवतो. अश्वारूढ शिवराय त्यांच्या वाटचालीमधील विजयाच्या उत्तुंग अवस्थेत उंच कड्यावर उभारल्याचा भास येथे होतो. उजवा पाय अगदी टोकाला थांबवलेल्या अवस्थेत आहे. शिवरायांनी घोड्याचा ओढलेला लगाम आणि तत्क्षणी थांबलेला घोडा, अशी चित्तथरारक रचना या पुतळ्याची आहे. प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी हा पुतळा बनवला असून, उठावदार चेहरा आणि बलदंड शरीरयष्टी असे शिवरायांचे व्यक्तिमत्त्व या शिल्पात आहे. घोड्याच्या शरीरशास्त्राचा सुंदर अभ्यास या पुतळ्याच्या माध्यमातून करता येतो. शिवाजी विद्यापीठाची तांत्रिक समिती प्रत्येक वर्षी या पुतळ्याची पाहणी करून प्रशासनाला अहवाल देते.
...
०७३३३
दोन पायावर उभा घोडा,
त्यावर स्वार रणरागिणी
कावळा नाका येथे शहराच्या सुरुवातीलाच समोर उभा ठाकतो तो करवीर राज्य संस्थापिका ताराराणींसाहेबांचा आवेशपूर्ण अश्वारूढ पुतळा आहे. दोन पायांवर उभा घोडा आणि त्यावर स्वार असलेल्या, छत्रपती ताराराणी. आपल्या उजव्या हातात उचललेली तलवार आणि चेहऱ्यावरील विजयी मुद्रेत शिल्पित केल्या आहेत. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे थोरले चिरंजीव आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार रवींद्र मेस्त्री या शिल्पाचे शिल्पकार आहेत. साधारण १४ फूट उंचीचे हे शिल्प घोड्याच्या मागच्या दोन पायांवर स्थिर आहे. पुढील दोन पाय आणि शेपूट हे समतोल साधण्याच्या दृष्टीने घोड्याने सावरल्याचा भास होतो. साधारण १० फूट उंचीच्या रचनात्मक ठेवण असणाऱ्या चबुतऱ्यावरील या भव्य शिल्पाचे अनावरण १९८१ ला छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांच्या उपस्थितीत, राज्यपाल ओ. पी. मेहरा यांच्या हस्ते झाले.
...
7331
रुबाबदार पोशाख,
डाव्या हातात संविधान
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापूर महापालिकेच्या इमारतीसमोरील हा पूर्णाकृती पुतळा. कांस्य धातूमधील या पुतळ्यामध्ये पाश्चिमात्य पद्धतीच्या रुबाबदार पोशाखात बाबासाहेब असून, डाव्या हातात संविधान, तर उजवा हात दिशा दर्शवण्यासाठी वर उचलला आहे. कोटाच्या बाह्यांमधून अगदी नेमकेपणाने शर्टच्या बाह्या हाताजवळ योग्य पद्धतीने दाखवल्या असून, शर्टची कॉलर आणि टाय बोल्ड उठावात दर्शवताना कोट आणि त्यावरचा तपशील कमी उठावात साकारला आहे. चेहऱ्यावर निश्चयी भाव, धीट नजर आणि आता बोलतील असे वाटणारे ओठ शिल्पकार डोंगरसाने यांनी उठावदारपणे साकारले आहेत. ॲड. महादेवराव आडगुळे महापौर असताना या पुतळ्याची संकल्पना पुढे आली. १९८७ मध्ये बिहारचे तत्कालीन राज्यपाल डॉ. आर. डी. भंडारे यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण झाले. विशेष म्हणजे या पुतळ्यासाठी महापालिका लोकप्रतिनिधी, प्रशासनाबरोबरच महापालिका कर्मचारी संघानेही सक्रिय योगदान दिले.
...
07332
राजर्षी छत्रपती शाहूंचे
पहिले भव्य स्मारक शिल्प
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पहिले स्मारक शिल्प छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत १९२७ मध्ये दसरा चौक येथे उभारण्यात आले. त्या काळातील शिल्पकार रावबहादूर गणपतराव म्हात्रे यांनी बनवलेले हे सुंदर शिल्प. शिल्पकारासाठी सगळ्यात आव्हानात्मक असणारी गोष्ट घडवणारे हे शिल्प ठरले. महाराजांचे व्यक्तिमत्त्व साकारताना शिल्पकाराने निवडलेली पोज आणि चेहऱ्यावरील भाव हे शिल्प पाहणाऱ्यांवर सर्वप्रथम प्रभाव टाकतात आणि लक्ष वेधून घेतात. हे शिल्प चारही बाजूंनी पाहता येते. महाराजांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्यातील कणखरपणा, त्यांची आदब या शिल्पात अनुभवायला मिळते. पुतळ्याचा चौथरा खालील बाजूस जाड व वरती थोडा थोडा कमी होत गेला आहे. त्यावर माहिती देणारा शिलाफलक कोरलेला असून, तो इंग्रजी आणि मराठी भाषेत आहे. त्यावर १२ एप्रिल १९२७ रोजी हिज एक्सिलन्सी सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केल्याचा उल्लेख आहे.
...
असे होते जतन व संवर्धन
शहरातील पुतळे, स्मारक, शिल्पांच्या रोजच्या स्वच्छता, पुष्पहारापासून ते देखभाल, दुरुस्तीपर्यंतची सर्व जबाबदारी चार विभागीय कार्यालयांतील उपशहर अभियंत्याकडे आहे. सर्व शिल्पे व स्मारके बनवताना ती अधिक वर्षे टिकतील, अशाच पध्दतीने साकारली आहेत. पूर्वी काही ठिकाणी पुतळ्यांना ऑईल पेंट दिला गेला. पण, याबाबत तक्रारी आल्यानंतर तज्ज्ञांकडून वेळोवेळी या पुतळ्यांचे ऑक्सिडायझेशन केले जाते. त्यामुळे हे पुतळे आणि स्मारके खणखणीतच आहेत. पण, खबरदारी म्हणून काही जुन्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यास भविष्यातील एखादा धोका टळू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.