महाडिक दही हांडी बातमी
७५४०
कोल्हापूर ः हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने धनंजय महाडिक युवाशक्तीची तीन लाखांची दहीहंडी मंगळवारी रात्री गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुपने फोडली आणि दसरा चौकात एकच जल्लोष झाला. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
गडहिंग्लजचा ‘संघर्ष’ मानकरी
युवाशक्तीच्या दहीहंडीचे तीन लाखांचे बक्षीस पटकाविले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच अशी ओळख असलेल्या धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने फोडली. गणेश कांबळे या गोविंदाने रात्री साडेदहाच्या सुमारास हंडीचा अचूक वेध घेतला आणि दसरा चौक मैदानाने एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान, चार तासांहून अधिक काळ गोविंदांचा थरार भर पावसात येथे अनुभवायला मिळाला.
सायंकाळी पाचपासूनच दसरा चौकात कोल्हापूरकरांनी गर्दी केली. सातच्या सुमारास गोविंदा पथकांनी सलामी दिली आणि थरांचा थरथराट सुरू झाला. शिवगर्जना, संघर्ष ग्रुप, नृसिंह, नेताजी पालकर पथकांनी सहा ते सात थर लावून सलामी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. कुपवाडच्या नृसिंह गोविंदा पथक, गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने सात थर लावले; मात्र त्यांना यश आले नाही. सुरुवातीला सहा फुटांनी हंडी खाली घेतली गेली. त्यानंतरही पथकांना अपयश आल्याने आणखी दोन फुटांनी हंडी खाली घेतली. पुन्हा सव्वादहाच्या सुमारास आणखी एक फुटाने हंडी खाली घेतल्यानंतर सोडत निघाली आणि त्यात पहिल्यांदा गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप पथकाला संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी सात थर यशस्वीपणे रचत हंडीचा अचूक वेध घेतला.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भागीरथी उद्योग समूहाच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक, मंगल महाडिक, पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजसिंह शेळके, किरण शिराळे, महेश वासुदेव, सुहास लटोरे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, शिवसेना शहराध्यक्ष सुजित चव्हाण, उद्योजक शंकर पाटील, प्रायोजक शिवराज पाटील, श्रीकांत सरनोबत, विप्लव कासलीवाल, पूजा कासलीवाल, प्रशांत पोकळे, प्रकाश पोकळे आदी उपस्थित होते. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सागर बगाडे, विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, अनंत यादव, विनायक सुतार यांनी पंच म्हणून काम पाहिले. दरम्यान, एका गोविंदाला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिके, जय श्रीराम हलगी पथक, श्रीमंत कोल्हापूर ढोल-ताशा पथकाचे वादन आणि सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने दहीहंडी उत्सवाची उंची आणखीन वाढवली. पावसाच्या सरी झेलतच हा सारा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

