

नारळाचे चित्र टाकणे
...
श्रीफळ देतेय संसाराचा गाडा हाकण्याला बळ
गणेशोत्सव सोहळा : विक्रीत २० टक्के वाढ, दसरा-दिवाळीपर्यंत मागणी राहणार कायम
रंगराव हिर्डेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वात आबालवृद्ध सहभागी होतात. भक्तिभावाने ‘श्रीं’ना श्रीफळ, दुर्वा अर्पण केल्या जातात. साहजिकच पूजेसह, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विषेशतः या कालावधीत नारळाच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. गणेशोत्सवासह दसरा कालावधीत किरकोळ नारळ विक्री हा सर्वसामान्यांच्या संसाराचा गाडा हाकण्याचे साधनच बनले आहे. त्यातून अनेक कुटुंबांचा या व्यावसायावरच उदरनिर्वाह चालत असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर परिसरातच उत्सव कालावधीत सुमारे १० लाख नारळांची विक्री होते. गणेशोत्सव काळात किरकोळ विक्रेत्यांकडून २० टक्क्यांनी मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सध्या नारळाची किंमत आकारानुसार १५ ते २५ रुपये आहे. नारळाच्या दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
कोल्हापूर बाजारपेठेत कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेशातून नारळाची आवक होते. तमिळनाडूतून येणारा नारळ खास करून तोरणांसाठी वापरला जातो. कर्नाटकातून येणाऱ्या ‘बोरनाळ’ जातीच्या नारळाची गोडी जास्त असते. त्यामुळे खाद्यपदार्थांत याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आंध्रप्रदेशातून पालकोल नारळाची, तर कर्नाटकातून सापसोल आणि तमिळनाडूमधून नारळाची आवक होत आहे.
कोल्हापुरात एरवी दररोज ३० हजार नारळांची आवक होते. गणेशोत्सवात मात्र हीच मागणी दिवसाला ४० हजारांवर जाते. तोरण बांधण्यासाठी तमिळनाडूमधून येणाऱ्या नारळाचा सर्रास वापर केला जातो. कोल्हापूरसह जिल्ह्यात सार्वजनिक गणपतीची संख्या अंदाजे दोन हजारांवर आहे. बहुतांश घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे उत्सव काळात नारळाला मागणी असते. मोदक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बोरनाळ जातीच्या नारळाला मागणी वाढल्याचे घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात शेकड्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर किरकोळ बाजारात नारळाच्या दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
...
घाऊक बाजारात
शेकड्याचे दर
सापसोल : २१०० ते २५००
नवा नारळ : १५०० ते १८००
पालकोल : १७०० ते १८००
..
हॉटेलमधूनही मागणी
उत्सवाच्या कालावधीत देशभरातून श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविक येतात. परिणामी, खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. हॉटेल, केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून कर्नाटकातून येणाऱ्या बोरनाळ जातीच्या नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. हे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी या नारळांना जास्त मागणी आहे.
...
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे
शहर परिसर - १०००
ग्रामीण भाग - ८४२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.