

मुस्लिम मतदारांची नवीन नोंदणी न करण्याचा ठराव
शिंगणापूर ग्रामसभेतील प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीत मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. या ठरावाची प्रत आज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी व करवीर तहसीलदार यांना दिले आहेत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. दरम्यान, नजर चुकीने अल्पसंख्याक बांगलादेशी मुस्लिम असा उल्लेख करण्याऐवजी, अन्य उल्लेख झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिंगणपूर गावची ग्रामसभा २८ ऑगस्ट २०२४ रोजी झाली. त्यात शिंगणापूर गावच्या हद्दीत नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणाऱ्या अल्पसंख्याकांची (मुस्लिम) नावे समाविष्ट करण्यात येऊ नयेत, असे सर्वानुमते ठरले. तसेच ज्या ज्या वेळी नवीन मतदार यादी प्रसिध्द होईल, तेव्हा नवीन अल्पसंख्याकांची (मुस्लिम) नावे नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायतीमार्फत हरकती घेऊन ती नावे कमी करण्यात यावीत, असा ठराव करण्यात आला. या ठरावाला सूचक म्हणून प्रमोद संभाजी मस्कर, तर अनुमोदक म्हणून अमर हिंदुराव पाटील यांची नावे आहेत. त्याच पत्रावर सरपंच रसिका पाटील व ग्रामविकास अधिकारी दीपाली येडके यांचीही सही आहे.
दहा दिवसांपूर्वी झालेल्या या ठरावाची प्रत आज व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही सरपंच सौ. पाटील व त्यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्याशी चर्चा करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
..............
सरपंचांची दिलगिरी
आमच्या गावच्या शेजारच्या गावात मे महिन्यात दोन बांगलादेशी महिला स्थानिक पत्यावरील आधारकार्ड काढून राहत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिंगणापूरच्या ग्रामसभेत चर्चा झाली. असे प्रकार रोखण्यासाठीचा आमचा प्रयत्न होता; पण काही लोकांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून सुरू केला आहे. चुकीच्या पद्धतीने प्रसिध्द झालेल्या या बातमीबद्दल या गावची सरपंच म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते, असे शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पाटील म्हणाल्या.
...............
अलीकडे काही गावांत बांगलादेशी महिला आढळून आल्याने आमच्या गावात ते रोखण्याचा प्रयत्न झाला. गावातील हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. ग्रामसभेचा ठराव चुकीच्या पद्धतीने व्हायरला झाला, त्यात ग्रामस्थांची काही चूक नाही.
- बाबासो मुल्लाणी, ग्रामस्थ, शिंगणापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.