निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
Published on

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
...........
15100
निवास शिंदे

खेळाडूंचा सरकारवर दबाव हवा
कोल्हापूरकर आणि फुटबॉल हे नाते किती घट्ट आहे, याची जाणीव आजी-माजी खेळाडूंसोबत फुटबॉलप्रेमींना अधिक आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत शाहू स्टेडियम आणि फुटबॉल स्पर्धा हे समीकरण झाले आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. शहराचा विस्तार होत आहे. पायाभूत सुविधा मिळत आहेत. रस्ते, पाणी, आरोग्य आदी समस्यांवर शासनही वेगाने काम करीत आहे. कोरोना काळात आणि नंतर आरोग्यविषयक सुविधाही सरकारने पुरविल्या आहेत. राज्याच्या एकूण विकासात सरकार कार्यरत आहे. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते या सुविधांसाठी आग्रही आहे. मोठे प्रकल्प, महामार्ग, मेट्रो, वंदे भारतसारखी वेगवान रेल्वे आदींबाबत सरकार आग्रही आहे. मात्र, क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा देण्यात का मागे पडत आहे? हा माझ्यासारख्या सर्वसामान्य खेळाडूला प्रश्‍न पडत आहे. खेळाडूंच्याही समस्या आहेत. कोल्हापूरचा विचार करता कोल्हापुरात फुटबॉलसह सर्वच खेळांसाठी पायाभूत सुविधा हव्यात. त्यासाठी गेले कित्येक दिवस आजी-माजी खेळाडू ‘सकाळ’च्या माध्यमातून ही मागणी व्यक्त करीत आहेत. निवासी फुटबॉल केंद्र सरकारने दिले तर कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतील नवोदितांना त्याचा लाभ होईल. मुले-मुली स्पर्धा, नोकरीनिमित्त सीमेबाहेर जातील. त्यामुळे खेळाच्या सीमाही वाढतील. केवळ स्थानिक फुटबॉल स्पर्धा म्हणजे विश्‍व नव्हे. फुटबॉल खेळाचा विस्तार झाला आहे. त्यासाठी कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्र सुरू करावे. जेणेकरून आजच्या जगात तरी कोल्हापूरची मुले-मुली व्यावसायिक स्पर्धेसह राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. अन्यथा हा खेळ स्थानिक स्पर्धांपुरताच राहील. याचा विचार करून शासनाने तातडीने पूर्वी होते, त्याप्रमाणे कोल्हापुरात हे केंद्र सुरू करावे.
- निवास शिंदे , ज्येष्ठ फुटबॉलपटू
...........
15099
नितीन मर्दाने

नवोदितांना शास्त्रोक्त प्रशिक्षणाची जोड हवी
स्थानिक फुटबॉल स्पर्धांमध्ये वरिष्ठ १६ संघांतील आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहून अनेक नवोदित खेळांकडे आकर्षित होतात. आजही हीच परिस्थिती कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात आहे. अमुक एकाचा खेळ पाहूनच मी त्या संघाचा सामना पाहण्यास आवर्जून छत्रपती शाहू स्टेडियमवर जातो, असे सांगणारी मंडळी आजही आहेत. याशिवाय शालेय फुटबॉल स्पर्धेत खेळलेले विद्यार्थी पुढे या संघांचे आधारस्तंभ होतात. अनेकांचा खेळ बहरतो. संघाची गरज आणि त्या संबंधित खेळाडूचा खेळ यांचा समतोल झाला की, तो खेळाडू स्थानिक स्पर्धांमध्ये रमतो. त्यातून संधी मिळाली तर तो खेळाडू १९ किंवा २३ वर्षांखालील स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करतो. कालांतराने त्याचा खेळात बदल घडल्यानंतर खेळावर परिणाम होतो. विशेषतः योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने शारीरिक इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठराविक वर्षांनंतर अनेकजण खेळ बंद करतात. किंबहुना त्यांना आवड असतानाही नाइलाजाने संघाबाहेर पडावे लागते. यासह राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी संधी कमी मिळतात. हेच जर कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्र झाले तर तेथून अत्यंत दर्जेदार व उच्चकोटीचे प्रशिक्षित खेळाडू राज्याला मिळतील. त्यामुळे ते स्पर्धांमध्ये देशात महाराष्ट्राचे नाव करतील. इतके दर्जेदार प्रशिक्षण या केंद्रातून मिळते. त्यामुळेच आज विविध खेळांमध्ये महाराष्ट्राचीच मुले-मुली ऑलिंपिकपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच हे केंद्र कोल्हापुरात पूर्ववत सुरू करावे.
- नितीन मर्दाने, ज्येष्ठ फुटबॉलपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com