खेळाच्या विकासासाठी ‘यूथलीग’वर भर हवा

खेळाच्या विकासासाठी ‘यूथलीग’वर भर हवा
Published on

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
............
15770
केतन आडनाईक

खेळाच्या विकासासाठी ‘यूथ लीग’वर भर हवा
भावी पिढी हेच कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाचे भविष्य आहे. त्यावर भर दिला तर उद्या हीच मंडळी राज्य, राष्ट्रीय आणि आय लीग संघातून खेळतील. यासाठी क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र व्हायला हवे. विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेर प्रशिक्षणासाठी जायची खेळाडूंची मानसिकता हवी. यासाठी प्रथम प्रशिक्षकांनी बाहेर जाण्याचा निश्‍चय केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करायला हवी. क्रीडा प्रबोधिनीच का हवी? कारण रोहन आडनाईक, अनिकेत जाधव, निखिल कदम, इंद्रजित चौगुले, सुखदेव पाटील, सौरभ सालपे, ओंकार मोरे हे सर्व याच क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू आहेत. त्यांनी आयएसएल, संतोष ट्रॉफी, नेपाळ लीग, आय लीग आदी नामांकित स्पर्धांमधून प्रतिनिधित्व केले. कारण त्यांना खेळासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रबोधिनीच्या १४, १७ आणि १९ वर्षांच्या संघांना थेट राज्य स्पर्धेसाठी प्रवेश मिळतो. त्यामुळे एखादा खेळाडू खेळासह अभ्यासातही दर्जेदार असेल तर त्याला पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. त्यातून तो पोलिस, लष्करात दाखल होऊ शकतो. शालेय स्तरापासून खेळाडू खेळत असेल तर त्याला जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र होणे गरजेचे आहे. कोल्हापूरच्या वरिष्ठ फुटबॉल संघांसह सर्वच प्रकारच्या वयोगटांत ग्रासरूटचा अभाव आहे. जो खेळाडू चांगला खेळतो, त्याला बोली लावून आपल्या संघात घेतले जाते. हे करण्यापेक्षा १४, १७ आणि १९ वयोगटांतील युवकांचे संघ वरिष्ठ संघाने तयार केले पाहिजेत. तरच खेळाच्या विकासाकडे जाता येईल. प्रबोधिनीच्या शिस्तीमुळे खेळाडू तयार करताना डायट प्लॅन, रिकव्हरी आदींकडे पाहिले जाते. आजकाल पालकच मुलांचा कल जाणून न घेता त्याला कधी बॅडमिंटन, तर कधी जलतरण आणि फुटबॉल खेळासाठी पाठवितात. त्यात सातत्य न ठेवता खेळ बदलतात. छत्रपती शाहू सुवर्ण चषक स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी आय लीग, आयएसएल लीगमधील संघांच्या नाकात दम आणला. इतके टॅलेंट स्थानिक खेळाडूंमध्ये आहेत. सोबत पोषक वातावरणही आहे. त्यामुळे आता क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी फुटबॉल केंद्राशिवाय पर्याय नाही.
- केतन आडनाईक, ज्येष्ठ फुटबॉलपटू
..............
15771
सौरभ लाड

कोल्हापुरी टॅलेंटला वाव द्या
गेले कित्येक दिवस आमचे आजी-माजी फुटबॉल खेळाडू सातत्याने कोल्हापुरात पूर्वी असलेले क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र व्हावे, ही मागणी लावून धरत आहेत. त्यासाठी ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी आंदोलनाचे हत्यारही उपसले आहे; पण राज्य शासनाचा क्रीडा विभाग अजूनही यावर मूग गिळून गप्प आहे. आता विधानसभा निवडणुका लागतील. त्याची आचारसंहिता लागू होईल आणि हा प्रश्‍न पुन्हा अनुत्तरित राहील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न इतर प्रश्‍नांसारखाच लावून धरला पाहिजे. शहराच्या प्रत्येक गल्लीत फुटबॉल खेळाचे चाहते आणि खेळाडू आहेत. पोषक वातावरण आणि प्रोत्साहन देणारी मंडळीही आहेत. आता वरिष्ठ १६ संघांनीही ही मागणी लावून धरणे गरजेचे आहे. खेळाचा प्रसार अधिक व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. शहराच्या कानाकोपऱ्यांत फुटबॉल खेळाचाच प्रभाव अधिक आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती या मागणीची आहे. विशेषतः क्रीडा प्रबोधिनीचेच खेळाडू ऑलिंपिकपर्यंत पोहोचू शकतात. इतकी ताकद त्यांच्या प्रशिक्षणात आहे. इतके दर्जेदार धडे खेळाडूंना लहानपणापासून देण्याची ताकद या प्रबोधिनीत आहे. त्यामुळे आता निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात आहे. लोकप्रतिनिधींनीही या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहायला हवे. राज्य शासनही सर्वच प्रश्‍नांसाठी रात्रीचा दिवस करून निर्णय घेत आहे. त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरू होत आहे. मग हा प्रश्‍नच मागे का राहिला, याचे कोडे तमाम कोल्हापूरच्या तमाम फुटबॉलरसिकांना पडले आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर कोल्हापूरला संघर्षाशिवाय काहीच मिळालेले नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गट-तट, पक्ष न पाहता वरिष्ठ पातळीवर या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणे गजेचे आहे. तरच हा प्रश्न मार्गी लागेल.
- सौरभ लाड, फुटबॉलपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com