शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
Published on

जिल्ह्यातील आठ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार
कस्तुरी सावेकर, प्रतीक पाटील, शाहू माने, नंदिनी साळोखे, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, आफ्रिद अत्तार, अन्नपूर्णा कांबळे यांचा समावेश

कोल्हापूर, ता. ३ : राज्य शासनातर्फे दिला जाणारा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जिल्ह्यातील आठ खेळाडूंना जाहीर झाला आहे. यामध्ये कस्तुरी सावेकरला शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (जमीन), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीक पाटील (सायकलिंग), शाहू माने (नेमबाजी), नंदिनी साळोखे (कुस्ती), वैष्णवी पाटील (रग्बी), श्रीधर निगडे (रग्बी) यांना जाहीर झाला. दिव्यांग खेळाडू मध्ये आफ्रिद अत्तार (जलतरण) व अन्नपूर्णा कांबळे (ॲथलेटिक्स) यांचा समावेश आहे. 

16078
वैष्णवी पाटील 
वैष्णवी पाटील पाडळी खुर्दची (ता. करवीर) रहिवासी आहे. तिने कुमार विद्या मंदिर पाडळी खुर्द येथे प्राथमिक शिक्षण तर न्यू कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. वैष्णवीने उझबेकिस्तान, जपान, इंडोनेशिया येथे झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा तर हांगझोऊ चीन येथे झालेल्या एशियन गेम्स, फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्‍हर्सिटी चॅम्पियनशीप तसेच नऊ राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला. शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना दोन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी व दोन खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रशिक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे.
---
16079
श्रीधर निगडे 
श्रीधर नागदेववाडीचा (ता. करवीर) रहिवासी आहे. श्री राम हायस्कूल भागशाळा कोपार्डे शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण, तर न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याने हाँगकाँग, चायना, कतार, श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच नऊ राष्ट्रीय आणि शिवाजी युनिव्हर्सिटी व भारती विद्यापीठ पुणेकडून खेळताना दोन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी व दोन खेलो इंडिया स्पर्धा खेळत सुवर्णपदक मिळविले आहे. प्रशिक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे.
----
16080
शाहू माने 
शाहू माने याने आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय व १४ राष्ट्रीय पदकांना गवसणी घातली आहे. २०१७ ला जपान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकून युवा ऑलिंपिकसाठी कोटा मिळविला. तेव्हापासून आजपर्यंत जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अर्जेंटिना, कतार, नेदरलँड, कोरिया व फ्रान्‍स या देशांमध्ये स्वतःच्‍या कौशल्याची झलक दाखविली आहे. शाहूचे प्राथमिक शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल येथे झाले. सध्या केआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तसेच गगन नारंग यांच्या गन फॉर ग्लोरी अकादमीमध्ये नेहा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे. 
---
15548
नंदिनी साळोखे
नंदिनी मूळची मुरगूडमधील असून, कर्नाटकातील स्पर्धेत महान भारत केसरीचा किताब पटकावला आहे. तिने अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत, सुवर्ण, नॅशनल गेम्स कुस्ती स्पर्धेत कांस्य, वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्‍व केले असून, सलग दहा वर्षे राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला आहे. सध्या ती निपाणी येथील देवचंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करीत आहे.
-----
15545
कस्तुरी सावेकर
मंगळवार पेठेतील कस्तुरी शहाजी छत्रपती महाविद्यालयात बी.एस्सी.भाग-१ मध्ये शिकत आहे. तिने २०२२ला एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी केली. तिने अन्नपूर्णा शिखर, मान्साळू, मेरा, कळसुबाई शिखर सर केले होते. तिने हिमालय माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचा ॲडव्हान्स्ड कोर्स सर्टिफिकेट अँड रिपोर्ट ‘ए’ ग्रेडने पूर्ण केला असून, बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सही केला आहे.
-----
15552
प्रतीक पाटील
प्रतीक मूळचा पेठवडगावचा आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तर उच्च माध्यमिक शिक्षण विठ्ठलराव पाटील महाविद्यालयातून झाले. त्याने २०२२ ला ६७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत १२० किलोमीटर रोड रेस प्रकारात सुवर्ण, कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील २६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत १२० किलोमीटर रोड रेसमध्ये सुवर्ण, तर महाराष्ट्र अजिंक्पद स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक पटकावले. केरळ, अलिगढ, राजस्थान, बिकानेर, दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेतही चमक दाखविली. त्याला महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे प्रमुख प्रताप जाधव, दीपाली पाटील, संजय साठे, विजय जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----
15554
अन्नपूर्णा कांबळे
अन्नपूर्णा रंकाळा टॉवर येथील धुण्याच्या चावी परिसरात राहते. ती पॅराजलतरणपटू आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमधून झाले. सध्या ती राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात एम.ए.चे शिक्षण घेत आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर उदयपूरला २०१७ ला झालेल्या स्पर्धेत कांस्य, मालवणच्या स्पर्धेत रौप्य, खेलो इंडियात दोन सुवर्ण, बंगळूरला प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य, कांस्य, गुवाहाटीला रौप्य व कांस्यपदक मिळविले. मध्य प्रदेशमधील स्पर्धेत तिने सुवर्ण व रौप्यपदक पटकावले असून, इटलीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिचा सहभाग राहिला आहे.
----
15550
आफ्रिद अत्तार
उचगावमधील आफ्रिद हा पॅरा जलतरणपटू असून, त्याचे शालेय शिक्षण जयभारत हायस्कूलमधून झाले. सदरबाजारमधील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. सध्या तो न्यू कॉलेजमध्ये एम.कॉम.चे शिक्षण घेत आहे. त्याने पॅरा जलतरणास २०१५पासून सुरुवात केली. त्याने राज्यस्तरावर २४ सुवर्ण, ४ रौप्य, राष्ट्रीयस्तरावर १० सुवर्ण, ८ रौप्य, ५ कांस्य, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ रौप्य व १ कांस्यपदक पटकावले आहे. त्याला प्रशिक्षक संजय पाटील, निळकंठ आखाडे, मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com