

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
......................
16315
जयदीप अंगीरवाल
तारांकित प्रश्न म्हणून सुटायला हवा
गेली कित्येक वर्षे कोल्हापूरची फुटबॉलप्रेमी मंडळी खास फुटबॉल हब व्हावे, या हेतूने क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्राची मागणी करीत आहेत. यापूर्वी मी स्वतः या केंद्रात प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. माझ्यानंतर अनेक खेळाडू, प्रशिक्षकांनी या केंद्रात प्रवेशित खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. मी पुन्हा पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर क्रीडा खात्याने कोल्हापुरातील निवासी फुटबॉल केंद्र अचानकपणे बंद केले. त्यामुळे २४ ते २५ वर्षांनंतरही हे केंद्र कोल्हापूरकरांना मिळू शकलेले नाही. विशेष म्हणजे या शास्त्रोक्त प्रशिक्षण केंद्राची गरज कोल्हापूरला आहे. याच्या उलट परिस्थिती अहिल्यानगर (अहमदनगर) येथे स्थापन झालेल्या क्रीडा प्रबोधिनीच्याच फुटबॉल निवासी केंद्राची आहे. या केंद्रात सुमारे दहा खेळाडू प्रवेशित आहेत. अल्प प्रवेशित असूनही कोट्यावधी रुपये या केंद्रावर खर्च केला जात आहे. म्हणजे सर्वाधिक संघ कोल्हापुरात आणि खेळाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या रास्त मागणीला क्रीडा विभाग वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. हे केंद्र पूर्ववत सुरू करण्यासाठी तुमच्या मातृसंस्थेने म्हणजेच के.एस.ए.कडून मागणीचा जोर वाढविला पाहिजे. हा प्रश्न विधानसभेत नेऊन आमदारांनी तारांकित प्रश्न म्हणून लावून धरला पाहिजे. गरजेची बाब म्हणून हा प्रश्न सुटायला हवा होता. राज्यात सर्वाधिक फुटबॉल टॅलेंट कोल्हापुरात आहे. या मातीतच अनेक फुटबॉलपटू घडत आहेत. त्यामुळे राज्याला किंवा देशाला चांगले दर्जेदार फुटबॉल खेळाडू भविष्यात मिळतील. त्यामुळे हे केंद्र लवकर सुरू करावे.
- जयदीप अंगीरवाल, आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक
...........
16313
गजानन कुराडे
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत
क्रीडानगरी म्हणून संस्थानकाळापासून कोल्हापूरचा डंका सर्वत्र आहे. कुस्तीपाठोपाठ फुटबॉल वेडे शहर म्हणूनही ओळख आहे. आता तर नेमबाजी, बास्केटबॉल, हॉकी, कबड्डी, ॲथलेटिक्स आदींमध्ये मुले, मुली पारंगत नव्हे तर थेट ऑलिंपिकपर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतंत्र भारताला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधवसुद्धा याच मातीत तयार झालेले कुस्तीगीर होते. पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक प्राप्त स्वप्नील कुसाळे हाही याच मातीतील आहे. त्याच्या प्रगतीत क्रीडा प्रबोधिनीचाच सिंहाचा वाटा आहे. आजच्या परिस्थितीत ब्राझील, जर्मनी, स्पेन, अर्जेंटिना, फ्रान्स या देशाचा जागतिक फुटबॉलमध्ये मोठा डंका आहे. त्यांचेच अनुकरण आपणही करत आहोत. तेथे ग्रासरुट डेव्हलसाठी हजारो निवासी, अनिवासी फुटबॉल केंद्र कार्यरत आहेत. त्यामुळे हे देश फुटबॉलमध्ये अव्वलच आहेत. कोल्हापूरचा विचार करता शालेय फुटबॉल स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटात मुले, मुलींचे दोनशेहून अधिक शालेय संघ आहेत. दरवर्षी शालेय फुटबॉल स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढतच आहे. पण या खेळातून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत खेळाडू राष्ट्रीयस्तरावर चमकतात. कारण हे खेळाडू पुणे, मुंबईचा रस्ता प्रशिक्षणासाठी धरतात. त्यामुळेच त्यांची खेळात प्रगती होते. जे खेळाडू या शहरात पैशाअभावी पोहोचू शकत नाहीत. ते स्थानिक पातळीवरच सराव करतात. मात्र, त्यांची इच्छा आणि खेळ दर्जेदार असूनही त्यांच्या टॅलेंटला वाव मिळत नाही. कोल्हापुरात जर क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र झाले तर अशा नवोदितांना संधी मिळेल. यात जीम, तज्ज्ञ प्रशिक्षक, वैद्यकीय सुविधा, दुखापत रिकव्हरी, आहार मार्गदर्शन एकाच छताखाली मिळेल. याच केंद्रातून अनेक खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाली. इतकी तयारी या केंद्रातून करून घेतली जात होती. या केंद्राची पुन्हा उभारणी होण्यासाठी सर्व तालीम संस्था, फुटबॉल खेळणारी मंडळे, शालेय , कॉलेज आणि लोकप्रतिनिधीं, पालकांनी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे आहे. हे केंद्र लवकर झाले तर त्याचा नवोदितांना फायदा होईल.
- गजानन कुराडे, फुटबॉल प्रशिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.