

राहुल गांधी आज
कोल्हापुरात येणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या (ता. ५) कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. श्री. गांधी आजच दिल्लीतून कोल्हापुरात येणार होते. मात्र, विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला.
आता कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता अनावरण होणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. श्री. गांधी या कार्यक्रमानंतर शाहू समाधीस्थळ येथे जाऊन अभिवादन करतील. त्यानंतर ते तपोवन मैदान येथे होणाऱ्या संविधान परिषदेत सहभागी होतील.
दरम्यान, खासदार राहुल गांधी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान दिल्ली विमानतळावर आले. त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे आजचा दौरा अचानक रद्द करावा लागल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजित कदम, आमदार मोहम्मद अरीफ नसीब खान, आमदार ऋतुराज संजय पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राहुल पाटील उपस्थित होते.
पुतळा अनावरण सोहळ्यासाठी गेले दोन महिने तयारी केली जात होती. शुक्रवारी पुतळा अनावरणानंतर शहरातील सर्व प्रभागातून रॅली, आतिषबाजी, विद्युतरोषणाई केली जाणार होती. संपूर्ण कसबा बावड्यातील प्रत्येक घराचे अंगण सकाळी रांगोळीने सजवले होते. दौऱ्यानिमित्त दिवसभर मोठा मोठा पोलिस फौज तैनात होता. दुपारपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींनी पुतळा अनावरणाकडे लक्ष लागले होते. भगवा चौकापासून पाटील गल्लीपर्यंत खुर्च्यांची मांडणी केली होती. या सर्व खुर्च्या भरुन लोकांना उभे रहावे लागेल अशी परिस्थिती असतानाच श्री. गांधी यांचा दौरा रद्द झाल्याचे समजले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.