साखर कारखान्यांचे कामगार कामाला

साखर कारखान्यांचे कामगार कामाला

Published on

सरकारनामाः लोगो
साखर कारखाना ः फाईल फोटो
...

नेत्यांसाठी साखर कारखान्यांतून ‘जोडण्या’ सुरू
सभासदांच्या पगारावर नेत्यांची चाकरी : तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून शड्डू ठोकण्याची तयारी

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : ऊस उत्पादक शेतकरी यंदाच्या गळीत हंगामाकडे आणि गेल्या वर्षीच्या प्रतिटन शंभर-दोनशे रुपयांच्या हप्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. साखर कारखानदारांना गळीत हंगाम सुरू करण्याऐवजी किंवा दुसऱ्या हप्ता देण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून आपल्यालाच तिकीट मिळावे किंवा तिकीट मिळाले नाही, तर अपक्ष म्हणून मतदारसंघात आपली बाजू भक्कम राहावी, यालाच महत्त्व दिले जात आहे.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांतील कामगार आणि अधिकारी आतापासूनच आपआपल्या नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण २३ साखर कारखाने आहेत. या प्रत्येक कारखान्यात सरासरी ४०० ते ५०० नियमित आणि २५० ते ५०० हंगामी कर्मचारी काम करतात. सर्व कारखान्यांमध्ये ७ हजार ५०० कायम आणि सुमारे सात हजार कर्मचारी हंगामी आहेत. यापैकी काही खासगी आणि सहकारी सोडले, तर ९० टक्के कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना आपल्या ‘साहेबा’च्या विधानसभेच्या निवडणुकीचा डोलारा घेऊन मतदारसंघात फिरावे लागत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच नेत्यांचा जयघोष करत हे कर्मचारी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कामाला लागले आहेत. साहेबांचे काम नाकारण्याचे धाडस करणाऱ्याला किंवा केवळ कारखान्याचा कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगाराला थेट विरोधक समजून त्याचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला जात आहे.
कामगारांना आपले मूळ काम सोडून सभासदांच्या पगारावर स्वत:चा स्वार्थ साधून घेण्याचे काम बहुतांशी कारखानदारांनी आतापासूनच सुरू केले आहे. प्रत्येक गावनिहाय कामगारांच्या कामाच्या जोडण्या लावल्या आहेत. आता नाही, तर परत नाही, म्हणून प्रत्येक कारखानदार रिंगणात उतरत आहेत. कामगारांकडून आपआपल्या नेत्यांनी केलेल्या आणि न केलेल्या कामांची माहितीपत्रके ज्या-त्या तालुक्यातील प्रत्येक घरात पोहोच करण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधीच इच्छुकांकडून मतदारसंघातील आपला पाया मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जरी एखादी पोस्ट व्हायरल केली, तरी त्याला उलट किंवा सक्षम उत्तर देणारी टीमही तयार केली आहे. सध्या, कारखाना कर्मचाऱ्यांनी उसाच्या याद्यांऐवजी मतदार याद्यांनुसार काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.
...
हंगामाचा बट्ट्याबोळ होऊ नये ...
राजकारणात आल्यापासून ‘साहेबां’ची ख्याती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कामगारांना दिली आहे. पै-पाहुण्यांच्या गाठीभेटींवर जोर ठेवा, कारखान्याच्या कारभाराबाबत चुकीचे बोलणाऱ्यांबद्दल माहिती घ्या, असे सूक्ष्म पातळीवर नियोजन सुरू आहे. मात्र, त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामाचा बट्ट्याबोळ होऊ नये म्हणजे झाले, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य ऊस उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com