

कॉंग्रेसच्या व्हायरल यादीत
कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज
१५ जणांची नावे; कॉंग्रेसचा मात्र दुजोरा नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची १५ उमेदवारांची यादी आज सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीला मात्र कॉंग्रेसने दुजोरा दिलेला नाही.
पक्षाच्या दिल्ली कार्यालयाच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीवर तारीख मात्र बुधवारची आहे. यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान या विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. यामध्ये कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, उत्तरमधून कै. चंद्रकांत जाधव, करवीरमधून कै. पी. एन. पाटील व हातकणंगलेतून राजूबाबा आवळे यांचा समावेश होता. राज्यातील बदलेली राजकीय समीकरणे पाहता शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मिळून महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहेत. यात कॉंग्रेसचे आमदार असलेल्या चारही जागा त्यांना मिळतील, अशी अपेक्षा होती. याप्रमाणे व्हायरल यादीत आमदार ऋतुराज पाटील यांचे नाव आहे.
महायुतीत ही जागा भारतीय जनता पक्षाकडे आहे. भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी व गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यापैकी कोणीही उमेदवार असला तरी खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप याऐवजी आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये असणार आहे. दोन्ही गटांच्या अस्तित्त्वाची लढाई असल्याने येथे चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, करवीरमधून कै. पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल यांची तर हातकणंगलेतून राजूबाबा आवळे यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. शिरोळ आणि इचलकरंजी मतदारसंघ मिळविण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील अंतिम निर्णयानंतर उमेदवार घोषित होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.