कुणालाचं सोप्प नायं, घासाघीस जोरात हायं...
फोटो 25899, 25900
.......
लोगो
फड मतदारांचा
-संतोष मिठारी
कुणालाचं सोप्प नायं, घासाघीस जोरात हायं
थंडीत ‘मॉर्निंग वॉकर्स’ची तापली चर्चा; ‘अरे काय? सगळी मिसळ झालीया बघ
‘अरे काय? अगदी जिल्ह्याच्या राजकारणाची मिसळ झालीया बघा’, ‘काही अंदाज लागत नाही’, ‘तुम्हाला सांगतो यंदाच्या टाईमाला कुणालाचं सोप्प नायं’, ‘घासाघीस जोरात हाय’, अशी चर्चा शहरातील विविध ठिकाणी फिरायला येणाऱ्या मॉर्निंग वॉकर्समध्ये तापू लागली आहे. प्रचार जसा गती घेत आहे तशी निवडणुकीबाबतच्या घडामोडींवर चर्चेचे फड रंगू लागले आहेत.
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या ‘ओपन जिम’मध्ये तीन-चार जणांचा व्यायाम सुरू होता. काही क्षणात त्यात आणखी दोघांचा समावेश झाला. त्यात उचगावमधून आलेल्या एकाने पायाचा व्यायाम करत करत ‘काय मग, वातावरण कसं हाय’ असं म्हणत निवडणुकीच्या चर्चेची सुरुवात केली. त्यांच्यासमोर दुसऱ्याने ‘अरे काय? सगळी मिसळ झालीया बघ, काही अंदाजच लागत नाही’ असं उत्तर देत स्ट्रेचिंग सुरू केले. ‘व्हय बरोबर हाय, अरे जनता बी हुशार झालीया रे, ऐकतीया सगळ्याचं पण, करतीया मनाचं’ त्यामुळेच काही दुम लागत नाही असे सांगत त्याला आणखी एकाने समर्थन दिलं. तेवढ्यात ‘उत्तरचं एकच उत्तर’ असे प्रचारगीत वाजणारी रिक्षा जवळच्या रस्त्यावरून टाकळाकडे गेली. ते ऐकून काय बी होऊ दे पण, ‘उत्तर’चा आमदार ‘राजेश’च होणार असा व्यायाम करणाऱ्या तिसऱ्याने अंदाज व्यक्त केला. त्याला ‘व्हयं पण, कुठला ‘राजेश’ असा इतर दोघांनी प्रतिप्रश्न करताच ते २३ ला सांगतो असे उत्तर देताच उपस्थितांमध्ये एकच हास्य फुलले आणि प्रत्येकजण व्यायाम करू लागले.
कृषी महाविद्यालयाच्या परिसरातून चालून आलेले काही ‘मॉर्निंग वॉकर्स’ तिथल्या प्रवेश कमानीसमोरील कट्ट्यांवर उन्ह खातं बसले होते. त्यातील एकाने त्यांच्या परिसरात झालेल्या पदयात्रेची चर्चा सुरू केली. काल कॉंग्रेसची पदयात्रा झाली. आज संध्याकाळी भाजपची असल्याचे सांगितले. त्यावर दुसऱ्याने ‘या प्रचारात उमेदवारांचं कुटुंब जोरात राबतयं राव’, अशी प्रतिक्रिया दिली. ‘तुम्हाला सांगतो यंदाच्या टाईमाला कुणालाचं सोप्प नायं, घासाघीस जोरात हायं. त्यामुळेच सगळे पळायला लागल्यात’ असे एकाने उल्लेख केला. त्यापूर्वी एक-दोन मिनिट आधी तिथं आलेल्या तीन-चार तरुणांपैकी एकजण ‘मग, काय झालं आम्ही करिअर घडवायला रोज पळतोय. ते सगळे पाच वर्षांतून महिनाभरच पळत्यात की, अशी टिप्पणी करत पुढे रनिंग करत निघून गेला. ‘दक्षिण’मध्ये गेल्या टाईमापेक्षा आता ‘टफ फाईट’ हाय बघ अशी चर्चा करत तेथून सगळे उठून पुढे निघाले.
चौकट
शेवटच्या दोनच दिवसांत वातावरण फिरणार
त्र्यंबोली देवीच्या मंदिरामध्ये लावलेल्या भक्तिगीतांचा सूर ऐकत काहीजण त्या टेकडीवर फिरत होते, तर काहींचा गणपतीची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामागील ट्रॅकवरून चालणे सुरू होते. काहीजण हनुमान मंदिराच्या परिसरात व्यायाम करत होते. त्यातील एकाने ‘पुशअप’ मारत ‘काय चाललंय भागात’ अशी विचारणा केली. त्यावर आता ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक या दोघांचा पण, जोरात प्रचार सुरू असून ‘फिफ्टी-फिफ्टी’ चित्र आहे. पण, जे काय हाय ते शेवटच्या दोनच दिवसांत वातावरण फिरणार बघ असं दुसऱ्यानं सांगितलं. राजकारण होऊ दे आणि कुणाचीही सत्ता येऊ दे पण, हे फुकट द्यायची सवय मात्र बंद होऊ दे. त्यापेक्षा रोजगार वाढू दे. रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचा दर कमी होऊ दे, कोल्हापूरचा विकास होऊ दे अशी अपेक्षा व्यक्त करत तिसऱ्याने चर्चेला गांभीर्याचे स्वरूप देत फुल्ल स्टॉप दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

