इचल : प्रताप होगाडे लेख

इचल : प्रताप होगाडे लेख

Published on

ich189.txt
फोटो फाईल - ich189.jpg

प्रताप होगाडे - निष्काम कर्मयोगी, निर्भीड योध्दा

आज सकाळी अनपेक्षितपणे प्रतापरावांच्या निधनाचे वृत्त कानावर पडले. मन सुन्न झाले. गतकाळाचा प्रदीर्घ सहवासाचा चित्रपट डोळ्यासमोरून झरझर पाने पालटत त्यांच्या जुन्या संघर्षमय जीवनाचा मागोवा घेऊ लागला. प्रतापरावांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय, अनेक अडचणींवर मात करून यशस्वी होण्यातच गेला.
त्यांच्यावर सामाजिक कार्याचे संस्कार वडिलांकडूनच झाले होते. परंतु त्याला योग्य दिशा मिळाली ती १९७४ मध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी लोक संघर्ष समितीद्वारे उभारलेल्या विद्यार्थी चळवळीतील सक्रिय सहभागातून. त्यापूर्वी ते निर्भीड स्वभावामुळे, प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंडखोर स्वभावामुळे बाळ ठाकरे यांच्या शिवसेना चळवळीशी जोडले गेले व इचलकरंजीत इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असतानाच शाखेची स्थापना केली. यातून पुढे १९७५ ते ७७ मध्ये आणीबाणी विरोधी सत्याग्रहात सहभागी झाले व ‘मिसा’ कायद्याखाली १६ महिने कारावास झाला. कारावासादरम्यान त्यांचा संपर्क समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, पन्नालाल सुराणा, भाई वैद्य आदींशी आला आणि विचारमंथनातून समाजवादी चळवळीशी मूळच्या जनसामान्यांच्या हितैषी स्वभावामुळे ते अखेरपर्यंत जोडले गेले.
तत्कालीन जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून केलेले कार्य, आंदोलनातून त्यांचे नेतृत्व गुण व बौद्धिक राजकारणावरील प्रमुख प्रकर्षाने स्थानिक जनतेसमोर व राज्यस्तरीय राजकीय व सामाजिक क्षेत्रात नावाजले जाऊ लागले. इचलकरंजी येथील सुवर्णमहोसवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सचिवपदाची यशस्वी धुरा सांभाळताना दाखविलेले महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या सांस्कृतिक चळवळीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन मित्रमंडळीसोबत मनोरंजन मंडळ या सांस्कृतिक संस्थेचा पाया घातला. त्या माध्यमातून अव्याहतपणे ही संस्था विविध लोकाभिमुख कार्यातून लोकप्रबोधन करीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत परिचित आहे.
आपटे वाचन मंदिर या तालुका वाचनालयाचा कायापायट करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे, हे आजही गौरवपूर्ण शब्दांत साहित्य क्षेत्रातील मान्यवर मान्य करतात. त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन, लोकविज्ञान चळवळ, राज्यस्तरीय नाट्य संमेलन, शाहीर परिषद, स्त्री-मुक्ती चळवळ आदी सांस्कृतिक पुरोगामी चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांचे नेतृत्व गुण व सामान्य जनांविषयी असलेली निष्ठा खऱ्याअर्थाने १९८५ मध्ये प्रकट झाली. इचलकरंजी नगरपालिकेत सत्ताधारी जनता पक्षाचे गटनेते म्हणून पाणी प्रश्‍न, शहर सुधारणा आराखडा, झोपडपट्टी अशा संवेदनशील प्रश्नांवर त्यांचे अभ्यासपूर्ण योगदान राहिले. त्यांची वेगळ्या पध्दतीची कार्यशैली चर्चेत राहिली.
कोणत्याही विषयाची सखोल माहिती मिळवून सामान्यावरील अन्यायाविरोधात त्यांची बंडखोरपणे कोणालाही दबावाला बळी न पडता लढत राहण्याची मनोवृत्तीच १९९६ पासून वीजविषयक आंदोलने व त्यातूनच राज्यव्यापी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या उभारणीला कारणीभूत ठरली. वीज चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्रित आणून लढा उभारणीसाठी एन. डी. पाटील, गोविंदराव पानसरे, निहाल अहमद, मधू दंडवते, पन्नालाल सुराणा आदी खाऊजा (खासगीकरण उदारीकरण चळवळी) चळवळीतील मंडळींसोबत राज्यभर घेतलेल्या परिषदांमधून वीज कंपन्यांच्या सामान्य जनावर खासगीकरणातून होत असलेल्या अन्यायाची चिरफाड केली व त्या आधारे बांधणीही केली. वीज आयोग असो वा राज्य सरकार, त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे अनेकवेळा कोंडीत सापडले. त्यातून सामान्य जनतेची हजारो कोटींची होणारी लूट थांबवली. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांपर्यंत होगाडे यांच्या कार्याची दखल घेणे आजअखेर क्रमप्राप्त ठरले. त्यातूनच ऊर्जा खात्यातील व कंपनीतील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढताना कोणत्याही प्रचंड दबावाला बळी न पडता सामान्यांच्या हिताशी कधीही तडजोड केली नाही की विचारांशी तडजोड केली नाही.
त्यांच्या परखड वृत्तीमुळेच त्यांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या. परंतु हितशत्रूंच्या सततच्या त्यांच्या नेतृत्वाला छेद देण्याच्या मनोवृत्तीमुळे काळाच्या पडद्याआड अस्तंगत झाल्या. तरीही त्यांनी नाऊमेद ना होता वीज, पाणी या क्षेत्रांत आपला दबदबा बौद्धिक क्षमतेच्या जोरावर टिकवून ठेवत विरोधकांनाही नतमस्तक होणे भाग पाडले. जीवनात व्यक्तीचे सर्व काही हरण होऊ शकते; परंतु बौद्धिक क्षमता ही जीवनाच्या अंतापर्यंत हरण होऊ शकत नाही. या उक्तीचे प्रमाण होगाडे हे मूर्तीमंत उदाहरण म्हणावे लागेल.
प्रताप होगाडे यांच्या जाण्याने महाराष्ट्राने समाजहित जपणारा एक कणखर लढाऊ योध्दा गमावला असून, औद्योगिक, शेतकरी, सामन्य वीज ग्राहक यांची अपरिमित सहजासहजी भरून न येणारी हानी झाली आहे. जगातून एक चालता बोलता संगणक पाहता पाहता अचानक शांत झाला. अवघ्या महाराष्ट्राला कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत सर्वदूर परिचित असणारा सामान्यजनांचा ज्वालामुखी काळाच्या उदरात विसावला, हेच म्हणता येईल.

- राजन मुठाणे
माजी विश्‍वस्त - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com