विधानसभा निवडणूक

विधानसभा निवडणूक
Published on

इंधनाची मागणी ३० टक्क्यांनी वाढली
रेकॉर्ड मात्र नियमितच ः विधानसभा निवडणुकीत वाहने सुसाट

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १८ ः विधानसभा निवडणूक प्रचारात वाहनांच्या वापरावर निवडणूक आयोगाने मर्यादा आणल्या तरीही निवडणुकीत वाहनांचा वापर टोकाचा झाला. महिन्याभरात पेट्रोलच्या मागणीत ३० टक्के वाढ झाल्याचे ठराविक पंपावर दिसते, तरीही असोसिएशनच्या रेकॉर्डवरून दहा टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येते. यातून एका महिन्यात किमान दोन कोटींची उलाढाल वाढल्याचा अंदाज आहे.
महिन्याभरात गळ्यात पक्षाचा स्कार्प, डोक्यावर पक्षाच्या रंगाची टोपी, पांढरी कपडे घालून बसलेले डबल, तिबल सीट कार्यकर्त्यांच्या दुचाकी गाड्या भरधाव वेगाने पंपात येतात. शंभर दोनशेची नोट देत पेट्रोल टाका, असा इशारा देतात. पेट्रोल भरताच पुढे आवडीच्या भागात रात्री उशिरापर्यंत फेऱ्या मारतात. असे दृश्‍य शहरासह ग्रामीण भागात दिसले.
प्रत्येक तालुक्यातील एक-दोन पंपांवर अशी स्थिती आहे. जिल्‍ह्यातील पंधरा ते सोळा उमेदवारांनी आपल्या विश्वासू व्यक्तीकडे कार्यकर्त्यांना पेट्रोलसाठी ‘रसद’ पुरविण्याची जबाबदारी दिली. अशा विश्वासूंनी कार्यकर्त्यांच्या गटाला ठराविक रसद द्यायची, ठरलेल्या पंपावर पेट्रोल भरण्याची सूचना केली की कार्यकर्ते पंपावर थेट जात होते. कार्यकर्त्यांना रसद पुरविण्याची जबाबदारी विश्वासूंनी पार पाडल्याने निवडणूक, पक्ष व उमेदवाराचा थेट काही संबध नाही, असे भासवले गेले.
कार्यकर्त्यांनी रांगेत उभे राहून पेट्रोल भरून घेतले. ते बहुतेक सर्व मतदारांनी डोळे भरून पाहिले. ज्या पंपावर दोन-चार वाहनांची रांग असते तिथे दिवसातून दोन-तीन वेळा ठराविक कार्यकर्ते पेट्रोल भरायला येत होते. असे असूनही पेट्रोल पंपचालक मात्र पेट्रोलची मागणी व उलाढाल वाढलेली नाही, असे सांगत आहेत. त्यांचे सांगणे व दिसणारे वास्तव यात तफावत आहे.
जिल्हा पेट्रोल डिझेल पंपा असोसिएशनचे अरविंद तराळ म्हणाले, ‘शहरात व महामार्गावर पेट्रोल पंपावर फारशी मागणी वाढलेली नाही. ग्रामीण भागात कुठेतरी तत्कालीक वाढू दिसू शकते.’
इंधन कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी, ‘जिल्‍ह्यात सरासरी एका कंपनीच्या पेट्रोलमध्ये १० ते १५ टक्के मागणी वाढली. दरमहा पेट्रोल साडेचार ते पाच लाख लिटर लागते. त्याऐवजी या महिन्यात साडेपाच लाख लिटरपर्यंत झाली. ऊस वाहतूक सुरू नसतानाही जिल्ह्यात २५ हजार लिटर डिझेल मागणीत वाढ आहे.’

चौकट
दोन कोटींची उलाढाल वाढल्याचा अंदाज
पंप कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार किमान ३० टक्के मागणी वाढली. तीन कंपन्यांचे पेट्रोल कोल्हापुरात येते. एका कंपनीचे पेट्रोल १ लाख लिटरने मागणी वाढली. तेवढीच वाढ अन्य दोन कंपन्यांच्या पेट्रोलची धरल्यास एकूण दोन लाख लिटरची मागणी वाढल्याचा अंदाज आहे. सरासरी १०४ रुपये पेट्रोल आहे. त्यातून दोन कोटींची उलाढाल वाढल्याचा अंदाज आहे. कदाचित यापेक्षाही जास्त वाढू असू शकेल, मात्र संख्या लपवली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com