

नमुना १७ सी फॉर्म घेतला का?
महत्त्वाचा दस्ताऐवज ः मतदान प्रतिनिधींसाठी अस्सल पुरावा
निवास चौगले ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिला जाणारा नमुना १७ सी हा महत्त्वाचा दस्ताऐवज समजला जातो. मतमोजणीसाठी हा फॉर्म महत्त्वाचा असून, त्यावर केंद्रात झालेल्या मतदानाची सविस्तर माहिती त्या मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षांच्या सहीने दिलेली असते. लोकसभेच्या निवडणुकीसह काही राज्यांतील पोटनिवडणुकीत झालेल्या मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारीत मोठा फरक पाहायला मिळाला. त्यातून राजकीय टोलेबाजी रंगली, पण अनेक मतदारसंघात नमुना १७ सी हा फॉर्मच उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे नसल्याने त्यावर आक्षेप घेताना संबंधितांना अडचणींचा सामना करावा लागला.
केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारीही उपलब्ध झाली नव्हती. हा फॉर्म त्यासाठीचा अस्सल पुरावा आहे. तो मतदान संपल्यानंतर त्या त्या केंद्रावरील केंद्राध्यक्षांनी उमेदवारांनी निवडलेल्या मतदान प्रतिनिधींना देणे बंधनकारक आहे. पण, प्रतिनिधींकडूनही याची मागणी होत नाही. त्यामुळे नमुना १७ सी घेतला का? अशी विचारण्याची वेळ आली आहे.
मतदान संपल्यानंतर या फॉर्मवर त्या केंद्रावरील एकूण मतदान, झालेले मतदान व शिल्लक मतदानाची आकडेवारी असते. त्याखाली केंद्राध्यक्षांची सही असते. मतदारसंघातील सर्व केंद्रावरील असे फॉर्म एकत्रित करून मतमोजणीपूर्वीच केंद्रनिहाय झालेल्या मतांची आकडेवारी यातून उपलब्ध होऊ शकते. मतमोजणीसाठी जाणाऱ्या प्रतिनिधींच्या हातात ही माहिती दिली तर प्रत्यक्ष मतमोजणीवेळी एखाद्या केंद्रावर मतांची आकडेवारी कमी-जास्त झाल्यास हा दस्तऐवज महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत आहे. त्यामुळे विजयी मतांचा फरक हा काही मतदारसंघात हजारातच असणार आहे. अशावेळी फेरमतमोजणीची मागणी झालीच तर त्यासाठीही हा मोठा पुरावा आहे. त्यामुळे उमेदवारांकडून सर्व मतदान प्रतिनिधींना हा फॉर्म घेतल्याशिवाय मतदान केंद्रातून बाहेर पडायचे नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठीची स्वतंत्र जबाबदारी त्या त्या केंद्रांतील प्रतिनिधींवर सोपवण्यात आली आहे.
मतदानासाठी मतपत्रिका लावलेले यंत्र, नियंत्रण करणारे यंत्र व मतदान झाल्यानंतर आपण दिलेल्या उमेदवाराच ते दिले का, याची खात्री व्हावी म्हणून जोडलेले व्हीव्ही पॅट अशी तीन यंत्रे असतात. या तिन्ही यंत्रांचे अनुक्रमांक या नमुना १७ सीवर दिलेले असतात. त्यामुळे मतमोजणीवेळी त्या मतदान केंद्राचे जे नियंत्रण युनिट वापरले जाते, तेच युनिट मतमोजणीसाठी आले का नाही, याची खात्री या फॉर्मवरून करता येते. याशिवाय कंट्रोल युनिटचा ‘रिझल्ट’ विभाग बंद करण्यासाठी मतदानाच्या दिवशी तो कागदी मोहर लावून सीलबंद केला जातो. त्यासाठी ज्या अनुक्रमाकांची कागदी मोहर वापरली आहे, त्याचा क्रमांकही या नमुना १७ सीवर लिहलेला असतो. त्यामुळे १७ सीचे महत्त्व लक्षात घेता, मतदान प्रतिनिधींकडून याची मागणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
ठळक चौकट
काय असते या फॉर्मवर
-एखादा मतदार केंद्रात गेला, स्वतःची ओळख पटवली. पण, त्याला मतदानच करायचे नसेल तर त्याची नोंद असते
-मतदान करताना संबंधितांनी गोपनीयतेचा भंग करणाऱ्याला मतदान करण्यास नकार देतात, त्याची माहिती
-एखाद्याचे मतदान अगोदरच झाले आणि नंतर संबंधित मतदार आला तर त्याच्या ‘टेंडर व्होट’ची नोंद
-एकूण मतदान, झालेले मतदान संख्या याची माहिती
-त्यावर संबंधित केंद्राध्यक्षांची सही
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.