फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...
फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...
..................................................
26346
विकी जाधव
निवडणुकीनंतर खेळासाठी एकत्र यावे लागेल
गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ कोल्हापूरकर आजी-माजी फुटबॉल खेळाडू ‘सकाळ’च्या माध्यमातून कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र व्हावे, यासाठी शासनाकडे मागणी करीत आहेत. फुटबॉल खेळाच्या विकासासाठी क्रीडा प्रबोधिनीचे हे केंद्र शहरात होणे आवश्यक आहे. खेळाचा विकास होण्यासाठी दर्जेदार तेही शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळाले की, मग खेळ कोणताही असो त्यात तो खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतो. एखादा खेळाडू एका रात्रीत राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकत नाही. त्यासाठी त्याच्या प्रशिक्षकांचे कष्ट महत्त्वाचे असतात. त्या खेळाडूची कौशल्ये, त्याची खासियत काय आहे, याची सर्व माहिती प्रशिक्षकांकडे असते. त्याच्यातील उणिवा काय आहेत, त्यात कशा सुधारणा करायच्या आणि त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची, हे सर्व काम प्रशिक्षण केंद्रात होऊ शकते. या प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक सुविधा असतील तर त्या खेळाडूला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल कामगिरी करता येऊ शकते. त्यामुळे कोल्हापुरात खास फुटबॉल खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यामुळे या खेळाच्या विकासासाठी एखादी फुटबॉल प्रशिक्षण देणारी अकादमी किंवा क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र झाले तर बरे होईल. यापूर्वी हे केंद्र का बंद झाले, याबाबत खेळाडूंना काहीच म्हणायचे नाही. मात्र, आता ते नवोदितांसाठी पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. जेणेकरून कोल्हापूरच्या मुला-मुलींचा खेळातील टक्का आणखी वाढून ती राष्ट्रीयस्तरावर चमकतील.
- विकी जाधव, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू
..............
26342
सागर भालकर
प्रशिक्षण केंद्रासाठी पुन्हा एकत्र येऊ
कोल्हापूरच्या पेठापेठांमध्ये फुटबॉल खेळणारी मंडळी गल्लोगल्लीत दिसतात. इतका खेळ या नगरीत वाढला आहे; पण त्याला शिस्तीच्या किंवा दर्जेदार कौशल्यपूर्ण खेळाच्या चौकटीत बसविण्याची गरज आहे. किंबहुना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, व्यावसायिक संघात निवड होण्यासाठी तितक्याच तोलामोलाची प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची गरज आहे. खेळ कोणताही असो, त्याच्या उत्कर्षासाठी दर्जेदार कामगिरी करणारे खेळाडू घडविण्यासाठी या प्रशिक्षण संस्था पैलू पाडण्याचे काम करीत असतात. म्हणूनच ऑलिंपिकमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आदी देश कायम अव्वल राहिले आहेत. या देशांमध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था आहेत. मुला-मुलींचा कल कोणत्या खेळाकडे अधिक आहे, त्यांची रुची, खेळातील कौशल्ये पाहून त्यांना योग्य ते प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाते. अशी केंद्रे खेळानुसार सरकारने स्थापन केलेली असतात. त्याचप्रमाणे केंद्रासह राज्य शासनाने ज्या शहरात एखादा खेळ चांगला बहरला असेल, त्या ठिकाणी संबंधित खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. आज कोल्हापुरात फुटबॉल खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यानुसार कोल्हापुरात ‘साई’च्या धर्तीवर किंवा क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्र होणे आवश्यक आहे. याचा लाभ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील मुला-मुलींना होईल. त्यामुळे आता निवडणुका संपल्याने सर्वांनी फुटबॉल केंद्र सुरू होण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच एकवटायला हवे.
- सागर भालकर, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

