चार प्रभागांवर निवडणूका-

चार प्रभागांवर निवडणूका-
Published on

महायुती सरकारमुळे महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग?

बहुमतामुळे निर्णय राबविण्याची संधी; न्यायालयीन निकालानंतर येणार प्रक्रियेला वेग

कोल्हापूर, ता. २४ : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद बहुमतामुळे महापालिकेची निवडणूक तीन किंवा चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे. या बहुसदस्यीय प्रभाग रचनेत व निवडणुकीच्या नवीन पॅटर्नमध्ये टिकून राहण्याचे आव्हान असल्याने आतापासूनच इच्छुकांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. काहींनी तर युतीत जायचे की कुठे, याचा अंदाज काढण्यासही सुरुवात केली आहे.
महायुतीला मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करायची आहे. त्यादृष्टीने निर्णय घेतले गेले. त्यातून न्यायालयीन वाद सुरू झाले. बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्यादृष्टीने महायुतीने वाटचाल सुरू केली होती. त्यानुसार तीन सदस्यीय प्रभाग रचनेची कार्यवाही ही केली होती. मात्र, त्या प्रक्रियेलाच स्थगिती दिल्याने सारे थांबले होते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख पे तारीख सुरू होती. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिका निवडणुकीची कोंडी फुटेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. महायुती सत्तेवर आली तर काय होईल, महाविकास आघाडी सत्तेवर आली तर काय घडेल, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
महायुतीचा कल बहुसदस्यीय प्रभागाकडे होता, तर महाविकास आघाडी एक किंवा दोन सदस्यीय प्रभागरचनेकडे होता. आता महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. यामुळे महायुतीला आपला निर्णय पुढे राबविण्याची संधी मिळाली आहे. मुंबईत भाजप, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढल्याने प्रलंबित महापालिकेची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इतर ठिकाणांच्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचाही गुंता लवकर सुटण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय पातळीवरील सर्व निर्णय घेऊन निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये महापालिका निवडणुकीचे धुमशान सुरू होईल, असे दिसते. न्यायालयीन पातळीवरील निकाल लागल्यानंतर या प्रक्रियेला वेग येणार आहे.

इच्छुकांची चाचपणी सुरू
बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार चार सदस्यीय प्रभाग होण्याची शक्यता आहे. त्यात टिकण्यासाठी अपक्षाऐवजी पक्षीय राजकारणाशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे इच्छुकांनी अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहिले तर कुठे जाणे सोईस्कर होईल, हे पाहिले जात आहे. काँग्रेस आघाडीतील काही माजी नगरसेवक गेल्या काही वर्षांत विकासकामाच्या कार्यक्रमांच्यानिमित्ताने राजेश क्षीरसागर यांच्यासोबत उपस्थित राहिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या हालचालींमुळे महायुतीच्या विजयानंतर अनेक इच्छुक तिकडे झुकण्याची शक्यता आहे. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यापैकी कुठे सोपे पडेल, वजन अबाधित राहील, याची चाचपणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com