

28272
इचलकरंजी : सर्कशीत लक्षवेधी खेळ सादर करताना शब्बीर महमद.
सर्कस व्यवसायिकांचा अस्तित्वासाठी संघर्ष
मनोरंजनाच्या इतर साधनांमुळे नागरिकांची पाठ; कलाकारांची मोबदल्यासाठी वणवण
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी,ता.२९ : महिन्याभरापासून इचलकरंजीत सर्कस सुरू आहे. मात्र दोन आठवड्यांत या सर्कशीचे केवळ दोन खेळ प्रसारित झालेत. तर महिन्याभरचा खर्च सुमारे तीन लाख असताना खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक नसल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी मनोरंजनाचा प्रमुख आधार मानला जाणारा हा व्यवसाय, आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. करमणुकीचे नवीन पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांनी पाठ फिरवल्याने आज सर्कशीच्या तंबूत शुकशुकाट दिसतो. मात्र, कलाकारांना पुरेशा मोबदल्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
इचलकरंजी शहरात सुमारे वीस वर्षांपूर्वी आकाशात बॅटरीप्रमाणे प्रकाश पडलेला दिसताच सर्वांना समजायचे की शहरात सर्कस आली. हा आकाशातील प्रकाश दूरवरून नजरेस पडताच प्रेक्षकांची पावले त्या दिशने वळत असत. शिवाय आजूबाजूच्या ग्रामीण भागांमध्ये ही सर्कस आल्याचे समजत होते. चित्तथरारक खेळ, जोकरची गंमत-जंमत, तर दुर्मिळ जंगली प्राणी हे सर्कशीचे विशेष आकर्षण होते. त्यामुळे सर्कस आल्याचे समजताच नागरिक खासकरून महिला, मुले मोठी गर्दी करीत होते. सहाशे - सातशेहून अधिक क्षमता असलेला सर्कशीचा तंबू हाऊसफूल होत असे.
नागरिकांचा प्रतिसाद पाहून सर्कशीचे महिनाभर वास्तव्य राहत असे. मात्र प्राण्यांना सहभागी करण्यास बंदी आल्यानंतर सर्कशीला उतरती कळा लागली. प्राण्यांवरील अत्याचारांबद्दल जागरूकता वाढल्यानंतर प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी सर्कसवर कठोर निर्बंध लादले. प्राणी कायद्यांमुळे सर्कशीतील सिंह, वाघ, हत्तींसारख्या प्राण्यांचा समावेश संपला. परिणामी सर्कशीचे महत्त्वाचे आकर्षण गेल्याने महिला व मुलांचे प्रमाण कमी होत गेले. त्यानंतर मोबाईल, टीव्ही, आणि व्हिडिओ गेम्स हे मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांमधील सर्कसची आवड कमी झाली. परिणामी अनेक चालकांनी सर्कस बंद करणे पसंद केले आहे.
---------------------------
सर्कस अधोगतीला जाण्याची कारणे
- प्राण्यांच्या समावेशावर आलेली बंदी
- मनोरंजनाच्या पर्यायांचा प्रभाव
- जागेची कमतरता
- कुशल कर्मचारी मिळण्यात समस्या
---------------
कोट
सर्कस हा व्यवसाय केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर तो कलाकारांच्या आयुष्याचा भाग आहे. अनेक पिढ्यांपासून सर्कशींमध्ये काम करणाऱ्या कुटुंबांसाठी हा व्यवसाय म्हणजेच जीवनाचा आधार आहे. आज या कलाकारांना स्थैर्य आणि मानधन दोन्हीसाठी झगडावे लागत आहे. शासनाकडून ही कला जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
- शब्बीर महमद , प्रभा सर्कस चालक
------------------
व्यावसायिकांनी हे करायला हवे
-प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- कुशल कर्मचारी तयार करण्यासाठी प्रयत्न करणे
- सरकारने सर्कस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणे
- जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर
- थीमवर आधारित शो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.