निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...

निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...

Published on

30056
30055

निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...

क्रीडा सुविधांचा प्राधान्याने विचार करा
फुटबॉल खेळणाऱ्या कोल्हापुरात शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारे शासकीय एकही केंद्र इतक्या वर्षांत उभे राहिले नाही. हे फुटबॉल खेळाच्या विकासासाठी अत्यंत मारक आहे. चाळीस वर्षांपासून अनेक खेळाडू घडले आहेत. मात्र, त्यांना खेळाबद्दलचे सखोल ज्ञान, शारीरिक प्रशिक्षण मिळाले नाही. ज्या संघाचे प्रतिनिधित्व करतात, त्यातीलच ज्येष्ठ मंडळी खेळाडूंना प्रशिक्षण देत असत. हीच परंपरा आजही ‘केएसए’चे वरिष्ठ संघ जपत आले आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मंडळी राष्ट्रीय स्तरावर चमकली. त्यासाठी या खेळाडूंनी इतर खेळाडूंचे अनुकरण करीत स्वतःमध्ये बदल करीत आपली कामगिरी सुधारली. खेळ दर्जेदार केल्याने रेल्वे, पोलिस, आरसीएफ, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आदी ठिकाणी नोकऱ्याही लागल्या. काळाबरोबर ‘फिफा’चे नियमही बदलले आणि खेळाची तंत्रे बदलली. त्यामुळे आज नवोदितांना ग्रासरूटपासूनचे प्रशिक्षण द्यावे लागते. यासाठी शहरातील काही शाळांमध्ये खास प्रशिक्षकांचीही नेमणूक केली आहे. पण, त्यांचे प्रयत्न सुविधांअभावी कमी पडत आहेत. सर्वाधिक खेळ कोल्हापुरात खेळला जातो. मात्र, त्याचे प्रशिक्षण देणारे केंद्र पुण्यात आहे. हे खेळाडू म्हणून पटत नाही. शासनाने रस्ते, पाणी, रेल्वे सेवा, मेट्रो अशा पायाभूत सुविधांवर लक्ष दिले आहे. त्यात क्रीडा क्षेत्रातील सुविधाही राज्यातील सर्वच जिल्ह्यांत होणे अपेक्षित आहेत. त्यानुसार कित्येक वर्षांपासूनची मागणी असलेले क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र येथे लवकर सुरू करावे.

- प्रेम बनसोडे (हणम्या), फुटबॉल खेळाडू
-----------------
दर्जेदार खेळाडू तयार होण्यासाठी केंद्र हवे
राज्यात कोणत्याही जिल्हा, शहरात फुटबॉल खेळावर प्रेम करणारी आणि प्रत्यक्षात खेळणारी मंडळी मिळणार नाहीत. इतकी मंडळी एकट्या कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात आहेत. गल्ली, गल्लीत लहानसहान संघ आहेत. याशिवाय केएसए लीगच्या माध्यमातून शंभरी पार केलेले फुटबॉल तालीम मंडळ, संघ आहेत. संस्थानकाळापासून फुटबॉल खेळ मातीत खेळला जातो. मात्र, इतके वर्षं खेळ सुरू असूनही एकही प्रशिक्षण देणारी संस्था या भूमीत नाही. क्रीडा विभागाने तर या खेळात खेळाडूंची संख्या अधिक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक महिन्यांपासून कोल्हापुरात पूर्वी जसे होते; त्याप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. यासाठी आजी-माजी, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू , संघटक, व्यवस्थापक, संघांचे कारभारी, फुटबॉलप्रेमी मंडळी आदी फुटबॉल वेडे सातत्याने केंद्र व्हावे; याकरिता ‘सकाळ माध्यम समूहा’च्या पाठपुराव्याने हे केंद्र कोल्हापुरात व्हावे; यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, क्रीडा विभाग या मागणीला बगल देत आहे. येत्या काळात हे केंद्र व्हावे; अन्यथा खेळाडूंना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. राज्य शासन सर्वत्र पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. खेळातील पायाभूत सुविधा म्हणून अशा पद्धतीचे केंद्र कोल्हापुरात झाल्यास फुटबॉल खेळातून दर्जेदार खेळाडू घडतील.
- अतुल भालकर, फुटबॉल खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com