निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...
निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या...
....................................................
30999
हर्षदा काटे
खेळाडूंच्या भविष्याचा विचार करावा
गेले कित्येक दिवस कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींच्या तोंडात क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्राचाच विषय आहे. कारण, नेमबाजीसह अन्य खेळांची प्रशिक्षण केंद्रे आहेत. मात्र, फुटबॉल खेळणाऱ्या शालेय मुला-मुलींसाठी काहीच सोय नाही. त्यामुळे असे केंद्र कोल्हापुरात व्हावे, यासाठी आजी-माजी खेळाडू, फुटबॉल संघटक ‘सकाळ’च्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहेत. तरीसुद्धा क्रीडा विभागाला अद्यापही जाग आलेली नाही. त्यामुळे आता क्रीडा विभागाला जाग येण्यासाठी आजी-माजी खेळाडूंसह शालेय खेळाडूंनाही या आंदोलनात उतरावे लागेल. गेला महिनाभर राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच शासकीय कार्यालयांतील कामे थंडावली होती. आता मात्र निवडणुकीनंतर मंत्रिमंडळही स्थापन झाले आहे. त्यामुळे येत्या काळात कोल्हापुरातील सर्वच आमदारांनी कोल्हापूरकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी लक्ष घालून तो सोडविणे गरजेचे आहे. सर्वच शाळांमध्ये आता मुलांसह मुलींचेही संघ आहेत. चौदा, सतरा आणि एकोणीस वर्षांखालील मुलांच्या संघातील खेळाडू पुढे स्थानिक वरिष्ठ संघांकडून खेळतात, तर मुलींना पुणे, मुंबई, बंगळूर आणि स्थानिक संघांतूनही स्थान मिळते. व्यावसायिक संघांचीही दारे आता कोल्हापूरच्या मुलींसाठी खुली होऊ लागली आहेत. इतका खेळ येथील घराघरांत रुजला आहे. त्यामुळे भावी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जेदार खेळाडू घडवायचे असतील तर क्रीडा प्रबोधिनीच्या या फुटबॉल प्रशिक्षण केंद्राशिवाय पर्याय नाही.
- हर्षदा काटे, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू
.............
30998
वैष्णवी शिंदे
क्रीडा विभागाने केंद्राला पुन्हा मंजुरी द्यावी
क्रीडा विभागाने आमच्या हक्काचे निवासी प्रशिक्षण केंद्र काहीच न कळविता बंद केले आहे. त्यामुळे अनेक पिढ्यांमधील खेळाडूंचा हक्कच क्रीडा विभागाने हिरावून घेतला आहे. ज्या शहरांमध्ये फुटबॉलचे वातावरण नाही, अशा शहरांमध्ये क्रीडा विभागाने अशी निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. अनेक केंद्रांमध्ये प्रवेशित मुले नाहीत. तरीसुद्धा अशा केंद्रांवर शासन लाखो रुपयांचा अवाढव्य खर्च करते. मात्र, ज्या कोल्हापूर शहरात मागणी आहे, त्या ठिकाणी अद्यापही काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे क्रीडा विभागाने आता तरी मागणीचा विचार करून हे केंद्र कोल्हापुरात पुन्हा सुरू करावे. गेले कित्येक दिवस फुटबॉल खेळाडूंसह संघटना, तालमी, मंडळे, क्लब यांच्याकडून हे केंद्र सुरू व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हे केंद्र म्हणजे शालेय खेळाडूंना खेळाची कौशल्ये, तंत्रे आत्मसात करायला महत्त्वाचे ठरणार आहे. शालेय पातळीवर संबंधित शाळेतील फुटबॉल प्रशिक्षक जेवढा कसून सराव करून घेतील, त्याच शिदोरीवर माझ्यासारख्या मुली आज वुमेन्स लीग, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी करीत आहेत. मात्र, आज अनेक मुली फुटबॉल खेळात येण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. किंबहुना कोल्हापुरात फुटबॉल वातावरणात असे केंद्र असणे जरूरीचे आहे. तरच आपले शहर कोलकाता, गोव्यासारखी फुटबॉल सिटी बनेल.
- वैष्णवी शिंदे, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

