राज्य नाट्य
फोटो-31006
खुर्चीला खिळवून
ठेवणारा नाट्याविष्कार
बुद्धिजीवी लेखकांचा मेंदू म्हणजे कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रावर ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ याप्रमाणे विचार आणि विकारांची लढाई सातत्याने सुरू असते. भावनातिरेकामुळे एका तत्त्वज्ञाच्या होणाऱ्या कोंडमाऱ्याची सिद्धहस्त कल्पना, सुबक मांडणी आणि प्रभावी नाट्यातून ताकदीने व्यक्त झाली. अरुण नाईक लिखित आणि रवीदर्शन कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोंडमारा’ हा नाट्यप्रयोग जाणीव चॅरिटेबल फाउंडेशनच्या कलाकारांनी सक्षमतेने सादर केला.
प्रा. दिवाकर पुरुषोत्तम गोरे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील एक परिच्छेद ‘हरकत पात्र’ ठरतो. ‘वैचारिक शांततेचा भंग’ केल्याबद्दल त्यांच्यावर ‘कार्यवाही’ करण्याचे ठरते. आपण लिहिलेल्या मजकुराचा त्यांनी इन्कार करावा, असे त्यांना सांगण्यात येते. प्रा. गोरे यामुळे अस्वस्थ होतात. या अस्वस्थतेचे सगेसोयरे असणारे त्यांच्याच मनातील वैचारिक, भावनिक घटक पात्रांच्या रूपात येऊन प्रा. गोरे यांच्या मेंदूत सुरू असणाऱ्या प्रचंड वैचारिक उलथापालथींना समोर आणण्याचे काम करतात. हा भयग्रस्त प्रसंग प्रा. गोरे, डॉ. आशुतोष देशपांडे यांनी अत्यंत समरसून साकारला आहे. बोलके डोळे, बरेच काही सांगून जाणारा त्यांचा सहज, सुंदर अभिनय, संयमी संवादफेक नाटकभर तशीच टिकून राहिली, हे विशेष वाखाणण्यसारखे आहे. त्यांचे मानसिक स्थैर्य बनून आलेली सुजाता, त्यांचे नाव प्रतिष्ठा असणारी लता, उच्चभ्रू प्रतिष्ठित मानसिकतेचे दर्शन घडविणारा भरत, त्यांची लेखणी बनलेली मार्गारेट, जनसामार्न्ंयांचे प्रतिनिधी असणारी दोन्ही सिद्धार्थ, तर व्यवस्थेचे प्रतिनिधी असणारे दोन इसम... या वैचारिक वर्गीकरणातून प्रा. गोरे यांचा वैचारिक संघर्ष टोकदारपणे उभा करण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला. सर्वच जण आपापल्या जागी उत्तम होते.
संहितेचा पैलू समजून घेऊन साकारलेले सूचक नेपथ्य प्रयोगाला दाद देऊन गेले. प्रा. गोरे यांच्या दिवाणखान्यातील खिडकीची रचना कल्पक. खिडकीकडे भयग्रस्तपणे पाहणारे प्रा. गोरे यांच्या आत होत असणारी प्रचंड उलथापालथ या निर्जीव खिडकीमुळे सजीव वाटत होती. पांढऱ्या कागदावर असणारी हृदयाच्या ठोक्याची रचना भीतीमुळे वाढणारा प्रा. गोरे यांचा तणाव दाखवणारी होती. याला अगदी उमदी साथ दिली ती प्रकाश योजनेने. वर टांगलेल्या खिडकीवर दोन्ही बाजूंनी पडणाऱ्या प्रकाशाची काळी सावली दिवाखान्याच्या भिंतीवर पडत होती. त्यामुळे प्रा. गोरे यांनी स्वत:भोवती स्वत:हून उभारलेला स्वकोषाचा पिंजरा अधिक स्पष्ट होत होता. पहिल्या प्रवेशात प्रा. गोरे यांच्या हातात लिहिती लेखणी आणि यामुळे निळ्या प्रकाशात चैतन्याने नाचणारी मार्गारेट आणि यानंतरच्या प्रत्येक प्रवेशात तिची असणारी मूक उपस्थिती प्रकाश योजनेमुळे बोलकी झाली. संयमी संगीत साथीने प्रयोगाला वेगळी उंची दिली.
अत्यंत क्लिष्ट विषय. तो समजून घेऊन त्यावर अभिनय करणे सोपी गोष्ट नव्हतीच. पण, प्रत्येकाकडून हा अभिनय करवून घेण्यात दिग्दर्शकाने कमाल केली. प्रा. गोरे यांच्या मुखी परत परत येणारे भरतचे संवाद किंवा भरतशी संवाद साधताना त्यांच्या हृदयातून लताची दिपू अशी येणारी लाडीक हाक, मला तिकडे न्या अशी प्रा. गोरे यांनी घातलेली आर्त साद त्यांचा ‘कोंडमारा’ समर्थतेने दर्शवते. अखेरच्या प्रसंगात वर टांगलेली खिडकी त्यावर पडलेला प्रकाश आणि त्याची सावली हा कोंडमारा आताच्या भौतिकवादी जगात अशाच पद्धतीने होत राहणार असा सूचक बोध देऊन जाते.
----
दिग्दर्शक : रवीदर्शन कुलकर्णी
पात्र परिचय
दि. पु. गोरे : डॉ. आशुतोष देशपांडे
सुजाता : डॉ. मीना ताशिलदार
सिद्धार्थ : आशिष जाधव
लता : स्वरूपा फडके
इसम : अथर्व मंगल
मार्गारेट : सई जाधव
एकनाथ : प्रथमेश गुरव
सिद्धार्थ २ : विष्णू महाजन
इसम २ : राजेश शिंदे
भरत : ओमकार साळोखे
तंत्रज्ञ
नेपथ्य : संजय हळदीकर
संगीत : विपुल देशमुख, श्रीपाद पाटील
प्रकाश योजना : अमोद पटवर्धन
रंगभूषा : सई जाधव, कलणी फडणीस, सदा सूर्यवंशी
नृत्य : कल्याणी फडणीस
वेशभूषा : डॉ. मीना ताशिलदार
दिग्दर्शन साहाय्य : ओमकार साळोखे
निर्मिती प्रमुख : मनीष देसाई, प्रमोद कुलकर्णी
निर्मिती साहाय्य : विशाल देसाई
----------------
स्पर्धेत आज...
० नाटक : म्याडम
० संस्था : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर
० स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, सायंकाळी सात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

