बेरडवाड्यावर साक्षरता वर्ग
chd121.jpg
31096
वरगाव बेरडवाड्यावर भरताहेत साक्षरता वर्ग
१५० लोक निरक्षर; १३ स्वयंसेवकांकडून अध्यापनाचे काम
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः दाटे (ता. चंदगड) पैकी वरगाव बेरडवाड्यावर रात्रीचे साक्षरता वर्ग भरत आहेत. यासाठी मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांनी पुढाकार घेतला आहे. वस्तीत सुमारे १५० लोक निरक्षर असून १३ स्वयंसेवकांच्या माध्यमातून निरक्षरांचे गट तयार करुन त्यांना अक्षरओळख करून दिली जात आहे. आगामी वर्षअखेरीपर्यंत त्यांना साक्षर करण्याचा निर्धार केला आहे.
बेरड समाजाच्या वाट्याला जमीन अत्यल्प आहे. बहुतांश कुटुंबे भूमिहीन आहेत. शेजारच्या गावांतून शेतमजुरी करणे, शेळ्या-मेंढ्या पालन, हमाली हाच त्यांचा उद्योग. घर-प्रपंच चालणे यालाच प्राधान्य असल्याने अनेकांना शाळेची पायरी चढणे शक्य झाले नाही. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक. गावातील शाळेत अध्यापन करणाऱ्या मुख्याध्यापक वरपे यांनी एकूण निरक्षरांची संख्या निश्चित केली. १५० लोक निरक्षर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची बैठक घेऊन साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. तुम्ही शिकायला तयार असाल तर मी सर्वतोपरी मदत करतो याची ग्वाही दिली. उपस्थितांनीही सहकार्याचा शब्द दिला. वस्तीतील संजीवनी नाईक, लता नाईक, अनिता नाईक, सरिता नाईक, रेणुका नाईक, पूजा नाईक, सुरेखा नाईक, अश्विनी नाईक, संगीता नाईक अशा तेरा सुशिक्षित तरुणी आणि महिलांना स्वयंसेवक म्हणून निवडण्यात आले. त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मीनाक्षी नाईक यांची पर्यवेक्षक म्हणून निवड केली. दररोज रात्री एक तास अध्यापनासाठी द्यायचे ठरले. सरपंच किरण नाईक, शाळा समितीचे अध्यक्ष महादेव नाईक यांच्या उपस्थितीत वरपे यांनी सर्व निरक्षरांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, अंकलिपी आदी साहित्य वाटप केले. प्रत्येक वर्गासाठी फलक, खडू, डस्टर आदी साहित्य देण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रथम तीन गटांना रोख रक्कम बक्षीस देण्याचे जाहीर केले. नियोजनानुसार दररोज रात्री वर्ग भरत असून वयोवृध्दांच्या तोंडून अ, आ, इ, ई चे सूर उमटत आहेत.
कोट
गरिबीमुळे अनेकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु संगणक युगात किमान अक्षरओळख महत्त्वाची आहे. त्यासाठी साक्षरता वर्गांचे नियोजन केले आहे. प्रतिसादही चांगला आहे
.- बाबूराव वरपे, मुख्याध्यापक, वि. मं. वरगाव (बेरडवाडा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

