निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या..
निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी एकत्र या..
..................................................
31324
साक्षी सरनाईक
केंद्रात मुलांसह मुलींचाही समावेश व्हावा
राज्यात दर्जेदार फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील फुटबॉल खेळणाऱ्या जिल्ह्यात क्रीडा विभागाने क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यानुसार ते कोल्हापुरात सुरू झाले. विशेष म्हणजे आठ वर्षांवरील खेळाडूंना या प्रबोधिनीच्या केंद्रामध्ये प्रवेश परीक्षेनुसार प्रवेश मिळत होता. मात्र, हा उद्देश बदलण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलांचा फुटबॉल खेळ वाढला आहे, असे समजून क्रीडा विभागाने मुलांच्याच क्रीडा प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मुलींचा फुटबॉल खेळ म्हणावा तितका विकसित झालेला नाही. याहीपेक्षा आमच्या शहरात खास मुलींसाठी एकही शासकीय प्रशिक्षण केंद्र, अकादमी नाही. आजच्या काळात राज्य आणि केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उत्तरप्रदेश, दिल्ली, बंगळूर आदी शहरांत स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाची विविध खेळांची प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यात फुटबॉल खेळाचाही समावेश आहे. त्यामुळे या शहरातील मुलींचे व्यावसायिक संघ कार्यरत आहेत. पुण्यातही खासगी प्रशिक्षण संस्थांकडून मुलींना खास प्रशिक्षण दिले जाते. मात्र हा खर्च आमच्या पालकांना परवडणारा नाही. आजमितीला कोल्हापूरच्या अनेक मुली पुण्यातील एका व्यावसायिक संघातून खेळतात. त्यांना प्रशिक्षण आणि खेळ यासाठी प्रायोजकत्व घेऊन खेळावे लागते. त्यातून जेवण, राहणे आदी खर्च भागवावा लागतो. हीच सोय कोल्हापुरात झाली तर माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षणाचा लाभ होऊन राज्य, देशासाठी प्रतिनिधित्व करता येईल.
- साक्षी सरनाईक, राष्ट्रीय महिला फुटबॉल खेळाडू
.................
31323
सूर्या सासने
खेळाडूंच्या भविष्यासाठी प्रशिक्षण संस्था हवीच
राज्यात फुटबॉलनगरी म्हणून सर्वांच्या तोंडात कोल्हापूरचे नाव आहे. मात्र, येथील संघांमध्ये एकही खेळाडू असा प्रशिक्षणाप्राप्त नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंचा दर्जेदार खेळ असूनही त्यांना स्थानिक स्पर्धांमध्येच अडकून पडावे लागले. कारण, व्यावसायिक व संतोष ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये खेळाडूंचे कौशल्य, दर्जा पाहिला जातो. शारीरिक क्षमता पाहिली जाते. अनेकदा विद्यापीठस्तरावर महाविद्यालयीन जीवनात अनेकजण खेळतात. मात्र, तेथे कस लागतो. कोल्हापुरात जर एखादी फुटबॉलचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारी संस्था असती तर आज चित्र वेगळे दिसले असते. अनेक खेळाडूंना राज्य संघात आपले कौशल्य दाखवून स्थान मिळवता आले असते; परंतु या नगरीत एकही शासकीय प्रशिक्षण देणारी संस्था नाही, हे आमच्यासारख्या खेळाडूंचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज आम्ही वरिष्ठ संघातून खेळत असलो तरी पुढील भविष्य म्हणजेच आठ ते दहा वर्षांवरील खेळाडूंसाठी शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारे फुटबॉल केंद्र या भूमीत व्हायला हवे. कारण, या नगरीत खेळाला पोषक वातावरण आहे. अनेक तालीम, फुटबॉल क्लब, तरुण मंडळांना संस्थानकाळापासूनचा वारसा आहे; परंतु संघातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाला मर्यादा आहेत. या मर्यादांमुळे खेळाडू स्थानिक संघातूनच खेळतात. त्यांना बाहेरील जगाची दारे उघडण्यासाठी राज्य शासनाने एखादी फुटबॉल प्रशिक्षण संस्था कोल्हापुरात सुरू करावी; जेणेकरून मुला-मुलींना या संस्थेचा उपयोग होईल. विशेष म्हणजे पुणे-बालेवाडीतील क्रीडा प्रबोधिनीतील फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रासारखी सोय या नगरीत व्हावी. यापूर्वी कोल्हापुरात फुटबॉलचे निवासी प्रशिक्षण केंद्र होते, हा इतिहास झाला. आता नव्याने हे केंद्र सुरू करावे. शासनाला हे शक्य आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून हे केंद्र सुरू झाले पाहिजे.
- सूर्या सासने, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

