लुटीचा मेन बाजार ः मालिका भाग २
लोगो आज प्रसिद्ध टुडे १ वरून घ्या
लुटीचा मेन बाजार ः मालिका भाग २
हायवेच्या ‘अल्याड-पल्याड’
मटका सुसाट.....
वाठार, गोकुळ शिरगाव एमआयडीसीत अड्डे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या गावात सध्या मटका, जुगारासह अवैध धंदे सुसाट सुरू आहेत. वाठारपासून पेठवडगावच्या हद्दीतील पंचवीस गावांत दोनशेहून अधिक टपऱ्यांत राजरोस ‘ओपन-क्लोज’ बाजार सुरू असतो. वाठार, नागाव, शिरोली एमआयडीसी, टोप, शिये, गोकुळ शिरगावपासून कागलच्या टोकापर्यंत हायवेच्या ‘अल्याड-पल्याड’ मटक्याचा जोर सुरू आहे. कागलमध्ये ‘शंभर’जणांची टीम एका नायकाच्या झेंड्याखाली घरपोच सेवा देत आहे.
पेठवडगाव ते वाठारच्या हद्दीत असलेल्या पंचवीस गावांत तब्बल दोनशेवर बुकींनी बस्तान मांडले आहे. रमी क्लबच्या १२ ठिकाणी पत्त्यांचे डाव सुरू आहेत. पण, याकडे लक्ष कोण देणार? अशी स्थिती आहे. प्रत्येक कार्यक्रमात साहेबांसोबत दिसणाऱ्या ‘अनिल’वर सेटलमेंटची जबाबदारी असल्याची चर्चा भागात सुरू आहे. गावात ‘राजकीय वजन’ निर्माण करण्यासाठी आता विशाल, बबन, अभी याच पैशांच्या जोरावर उड्डाणे घेत आहेत.
नागावकर, शिरोलीकरांचा रुबाब आगळा....
एमआयडीसी भागाला पानटपऱ्यांचा विळखाच पडला आहे. शिरोली, टोप, शिये, नागावमध्ये यातील टपऱ्यांतच मटका घेतला जातो आहे. कामगारांचा पगारच या मटका बुकींची उधारी भागवताना खर्ची पडत आहे. अशीच परिस्थिती गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील कामगारांची बनली आहे. उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, हलसवडे परिसरात मटक्याच्या टपऱ्या चौकांत थाटल्या आहेत. गांधीनगरची हद्द सांभाळणारा एक ‘लेखणी सम्राट बाबा’ पत्त्यांचा क्लब चालवत आहे. कणेरी परिसरात दोन टपऱ्या रस्त्यालगतच सुरू असून, घरी जाता-जाता अनेकांचे पाय येथे वळतात.
चौकट
कागलची ‘घरपोच मटका’ सेवा
कागल एसटी स्टॅन्ड, ठाकरे चौकातील पाण्याची टाकी, लक्ष्मी टेकडीजवळ झुडपात असलेल्या टपऱ्यांमध्ये मटक्याचा धंदा फार्मात चालतो. निवडणुकीसाठी ‘इच्छुक’ असलेल्या एका नायकाने आपली १०० जणांची सेना ‘घरपोच मटका’ सेवेसाठी दावणीला बांधली आहे. फोन वाजला की सेनेतील एकजण जाऊन ‘टिप्पण’ घेऊन येतो. ‘बच्चन’ ही त्याच्या जोडीला सरसावला आहे. भागातील राजकीय वजन वापरून संदीप, रमेशनेही ‘लाखाच्या’ मलिद्यावर आपले बस्तान बसवले आहे. काही वर्षांपासून गडहिंग्लजचा कलेक्टर असलेला म्होरक्या बदलीनंतरही कागलमध्ये आपली ‘ताकद’ आजमावत असल्याचे चित्र आहे.
चौकट
वाशीपासून भोगावतीपर्यंत पार्ट्यांची चंगळ...
करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. वाशीपासून भोगावतीपर्यंत मटक्यांच्या टपऱ्या वाढल्या आहेत. ‘सलिम’ शहरात बसूनच या भागातील व्यवहार सांभाळत आहे. शनिवारी हिशोब घेऊन तो सुभाष रोडला पोहोचतो. सकाळी अकरा वाजता त्याचा ‘दरबार’ सुरू होतो. व्यवहार पूर्ण झाला की वाशीपासून कांडगाव, भोगावतीत विशेष पार्ट्यांची चंगळ सुरू होते. दोन दिवसांत ‘मर्जीतल्या साहेबांची’ एक स्पेशल गाडी ‘डोंगराला’ रवाना होणार आहे. गाडीत मात्र करवीरच्या कोणाला न घेता ‘उजळाईवाडीच्या’ काहीजणांसाठी सीट्स ‘राखीव’ ठेवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

