गड- गोडसाखर कारखाना अपहार

गड- गोडसाखर कारखाना अपहार
Published on

‘गोडसाखर''मध्ये २९ कोटींचा आर्थिक घोटाळा

डॉ. शहापूरकरांसह २१ जणांवर गुन्हा; मुख्य लेखापालास अटक

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या वैधानिक लेखापरीक्षणात २९ कोटी ७१ लाख ८० हजार रुपयांचा घोटाळा उघडकीला आला आहे. अपहार व नुकसानीच्या प्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, तीन कार्यकारी संचालकांसह आठ जण; तसेच १३ तोडणी-वाहतूक कंत्राटदार अशा एकूण २१ जणांवर आज (ता. १३) पहाटे येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कारखान्याचे वैधानिक लेखापरीक्षक तथा चार्टर्ड अकाऊंटंट सुशांत फडणीस (कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर (काळभैरी रोड, गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची सोमवारपर्यंत (ता. १६) पोलिस कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आर्थिक अपहार व कारखान्याच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांमध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर (मूळ रा. कौलगे, ता. गडहिंग्लज, सध्या रा. प्रतिभानगर, कोल्हापूर), मुख्य लेखापाल रेडेकर, तत्कालीन कार्यकारी संचालक औदुंबर रेवणसिद्ध तांबे (सिंहगड, पुणे), सुधीर शामराव पाटील (इस्लामपूर, जि. सांगली), महावीर सिद्धराम घोडके (हाळचिंचोली, ता. अक्कलकोट), माजी सचिव कै. मानसिंगराव अनंतराव देसाई (कडगाव रोड, गडहिंग्लज), अर्कशाळा प्रमुख रणजित बाबुराव देसाई (ऐनापूर, ता. गडहिंग्लज), तत्कालिन मुख्य शेती अधिकारी लक्ष्मण भैरू देसाई (लिंगनूर तर्फ नेसरी, ता. गडहिंग्लज) यांच्यासह तोडणी-वाहतूक कंत्राटदार श्रीमंत बसाप्पा पुजारी (रा. नंदनवाड, ता. गडहिंग्लज), राजेंद्र नारायण देसाई (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज), संतोष बंडू पाटील (भादवण, ता. आजरा), अनिल श्रीकांत भोसले (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज), शिवाजी ईश्वर शिंत्रे (रा. बेळगुंदी, ता. गडहिंग्लज), सयाजी नारायण देसाई (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज), बसवराज मलाप्पा आरबोळे (तनवडी, ता. गडहिंग्लज), रूपाली किरण पाटील, महेश विलास ताडे, विलास पांडुरंग ताडे, यलुप्पा बोकडे, हणुमंत दादाराव तोंडे, दादाराव जोतिबा तोंडे (सर्वांचे पत्ते उपलब्ध नाहीत) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यातील तत्कालीन सचिव मानसिंगराव देसाई यांचे गुरुवारीच (ता. १२) निधन झाले आहे.
कारखान्याने २०२३-२४ या कालावधीसाठी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून सुशांत फडणीस अॅन्‍ड कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार फडणीस यांनी या कालावधीतील कारखान्याचे लेखापरीक्षण केले. त्याचा अहवाल २६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना सादर केला. या परीक्षणामध्ये कारखान्याच्या आर्थिक व्यवहारात मोठे आर्थिक घोटाळे व प्रशासकीय अनियमितता आढळून आल्याचे अहवालात नमूद केले आहे. या गैरव्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश मिळावेत म्हणून साखर आयुक्तांना विशेष अहवाल दिला होता. त्यानुसार २ डिसेंबर रोजी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईच्या सूचना साखर सहसंचालकांकडून फडणीस अॅन्‍ड कंपनीला मिळाल्या. दरम्यान, डॉ. शहापूरकर यांच्या एकतर्फी कामकाजासंदर्भात व महत्त्वाचे आर्थिक निर्णय संचालकांच्या पूर्वसंमतीविना घेतल्याची तक्रार संचालक मंडळाने साखर आयुक्त व सहसंचालकांकडे केली होती.
अर्कशाळा आधुनिकीकरण, जुना गिअर बॉक्स खरेदी, तोडणी-वाहतूक अॅडव्हान्स, बॉयलर आधुनिकीकरण, टर्बाईन खरेदीतून झालेला ११ कोटी ४२ लाख ६४ हजारांचा अपहार, तर प्रशासकीय मंजुरी न घेता अर्कशाळा आधुनिकीकरण, तोडणी-वाहतूक अॅडव्हान्स व अधिकाराचा गैरवापर करून प्रशासकीय मंजुरी न घेता केलेल्या खरेदीमधील अनियमिततेमुळे कारखान्याला १८ कोटी २९ लाख १६ हजारांचे नुकसान झाले. या अपहार व नुकसानीला वरील २१ जण जबाबदार असल्याचे सुशांत फडणीस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर करीत आहेत.

चौकट...
* अन्य संचालक जबाबदार नाहीत
दरम्यान, कारखान्यातील या अपहार व नुकसानीला अन्य १८ संचालकांना जबाबदार धरण्यात आले नसल्याचे सुशांत फडणीस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कारण या संचालकांनी वेळोवेळी डॉ. शहापूरकर यांच्या एकहाती बेकायदेशीर कारभारावर आक्षेप घेऊन त्याबाबत साखर आयुक्त व सहसंचालकांकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच लेखापरीक्षण कालावधीत १४ ऑक्टोबर रोजी लेखी पत्राने शहापूरकर यांच्या बेकायदेशीर कारभारावर आक्षेप नोंदविला आहे. आक्षेप नोंदवल्यानंतर सहकार कायदा कलम ७३ अन्वये त्यांना जबाबदार धरण्यात आले नसल्याचे फडणीस यांनी फिर्यादीतच स्पष्ट केले आहे.

* दृष्‍टिक्षेपात अपहार अन् नुकसान
--------------------------
* यात झाला अपहार...
- बेकायदा अर्कशाळा विस्तार : २ कोटी ३८ लाख
- जुना गिअर बॉक्स खरेदी : २ कोटी २४ लाख २३ हजार
- तोडणी-वाहतूक अॅडव्हान्स : ९८ लाख २१ हजार
- बॉयलर आधुनिकीकरण : ४ कोटी ४६ लाख १३ हजार
- टर्बाईन खरेदी : १ कोटी ३५ लाख ३१ हजार
-------------------------
* नुकसान...
- अर्कशाळा आधुनिकीकरण : १ कोटी ६१ लाख २४ हजार
- तोडणी-ओढणी वाहतूक अॅडव्हान्स येणे : ६ कोटी २ लाख ९२ हजार
- अनियमित व आर्थिक प्रशासकीय मंजुरीविना खरेदी : १० कोटी ९९ लाख २५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com