

जे समाजात घडते ते राजकरणात उतरते
निलम गोऱ्हे : ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयाला भेट; ‘लाडक्या बहिणी’मुळे नवी ‘व्होट बॅंक’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : राजकरण हे समाजमनाचा आरसा आहे. तेथे कोणी साधूसंत नाहीत. जे समाजात घडते ते राजकरणात उतरते आणि जे राजकरणात घडते ते समाजकरणात उतरते, अशा स्पष्ट शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ‘राजकरण आणि समाजकरणा’चे विश्लेषण केले. ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयाला त्यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधला. संपादक निखिल पंडितराव यांनी त्यांचे स्वागत केले.
गोऱ्हे म्हणाल्या, ‘आजपर्यंत अनेक वेळा प्रचारात महिलांसमोर गेल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे होते. त्यामुळे त्यांची नाराजी दिसत होती. मात्र, यावेळी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले होते. त्यामुळे काहींनी साडी घेतली. काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी वापरले. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. त्यांची आता नवीन ‘व्होट बॅंक’ तयार झाली आहे. स्त्री ही कुटुंबाची प्रमुख असल्याने तिला अनेकवेळा रोजगार हमीवरही जावे लागते. कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात ही फारशी परस्थिती नसली तरीही विदर्भ, मराठवाडा परिसरात आहे. ‘लाडक्या बहिणी’मुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महिला आता क्रीडा, पर्यटन, बॅंकिंग, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने आहेत. अत्याचाराबाबत समाजाची मानसिकता कारणीभूत आहे. यासाठी पोलिसांसोत बैठका घेऊन तक्रारींबाबत विचार करणे आवश्यक वाटले.’
राजकरणातील व्यक्तींकडून झालेल्या गुन्ह्याची गांभिर्याने दखल घेतली जात नाही, त्याकडे डोळेझाक केली जाते, अशा काही प्रश्नांवर गोऱ्हे म्हणाल्या, ‘कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारींचा विचार केला जातो. जे अनैतिक आहेत त्यांचाही विचार होतो. पण, अनेक वेळा तो राजकीय असला तर त्याकडे किती गांभिर्यांने पाहायचे यावरही विचार करावा लागतो. अंगणवाडी सेविका, आशा वर्करना आवश्यक सुविधा दिला जात आहेत. मोबाईल हॅण्डसेट दिला आहे. दुचाकी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०२९ मध्ये तर आता निवडणुकांसाठीही आरक्षण येणार आहे. त्यामध्येही एस. सी., एस.टी.साठीही आरक्षण असणार आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्या महिलांना संधी मिळाली पाहिजे, असे वाटते.’
चौकट
...म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून उद्धव ठाकरे दूर जात असल्याचे दिसले. समान नागरी कायदा, काश्मीरचे कलम ३७०, राम जन्मभूमी हे मुद्दे बाळासाहेब ठाकरेंचे होते. त्यालाच उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली. मी पत्र लिहून त्यांना समान नागरी कायद्याबाबत पाठिंबा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. मात्र, त्यांनी त्याला विरोध करायला पाहिजे असे सांगितले. त्यामुळे मी अतिशय दुःखाने ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडली, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.
चौकट
महिलांच्या हितासाठीच या बैठका
मी काल पोलिसांची बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा माझ्याशी वाद झाला आहे काय? मी पोलिसांच्या बैठका का घेत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, स्त्री चववळ आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी ४० वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. या काळात राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी आपण अनेक वर्षे महिलांच्या प्रश्नाबाबत बैठका घेत आहोत. त्यातून महिलांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी पोलिस दलातील कॉन्स्टेबलची मानसिकता बदलण्यापासून पोलिस ठाण्यातील समस्यांबाबतचे प्रश्न समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात आहेत. तरुणी व महिलांसाठी कार्य करत आहोत. त्यामुळे गैरसमज होऊ नये, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.