

क्रीडा विभागाचे मिशन काही ‘लक्ष्यवेध’ घेईना
कोल्हापूरसाठी मंजूर विभागीय स्पोर्टस् एक्सलन्स सेंटर अद्याप कागदावरच
सचिन भोसले ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः राज्यातील खेळाडूंनी ऑलिंपिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके मिळवावीत, या उद्देशाने राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत खास कोल्हापूरसाठी मागील वर्षी मंजूर झालेले विभागीय स्तरावरावरील स्पोर्टस् एक्सलन्स सेंटर अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे आता खेळाडूनी ऑलिंपिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी कशी करायची? असा सवाल खेळाडूंसह पालकांमधून विचारला जात आहे.
मागील वर्षी राज्यातील विविध खेळांतील ७३ खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३३ खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिक पदके मिळवली. त्यामुळे शासनाला खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानुसार राज्याच्या क्रीडा विभागाकडून ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. त्यानुसार तत्कालीन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेटर, विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स, तर जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिमा विकास केंद्र अशी क्रीडा प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्याबाबतचे ‘मिशन लक्ष्यवेध’ ही नवीन महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्याची शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी क्रीडा प्रतिमा विकास केंद्र स्थापन्याचे ठरले. मात्र, वर्षभरात याबाबत क्रीडा विभागाचा नंदी एक इंचही ना पुढे सरकला ना मागे सरकला. त्यात आता सरकार बदलल्याने हा महत्त्वाकांझी प्रकल्प जवळजवळ बारगळला की काय, अशी अवस्था आहे.
..............
समाविष्ठ क्रीडा प्रकार
ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस या क्रीडा प्रकारचा समावेश होता.
..........
राज्यातील आठ ठिकाणी मंजूर
कोल्हापूरसह नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, मुंबई या आठ ठिकाणी विभागीय स्पोर्टस् एक्सलन्स सेंटर सुरू करण्याचे ठरले होते. मात्र, अद्यापही कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत.
------------
या सुविधांचा समावेश होता
- पायाभूत सुविधा-क्रीडा साहित्य
- खेळाडूंच्या सराव व मूल्यांकनासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
- स्पोर्टस् सायन्स सेंटर (क्रीडाविषयक चाचण्या, उपचार व पुनर्वसन करण्याची सधी)
- करियर मार्गदर्शन
- देशी-विदेशी संस्थांच्या सहयोगाने क्षमता विकास उपक्रम राबविणे
- राज्यातील खासगी क्रीडा अकादमीचे सक्षमीकरण करणे
- खेळाडूंची निवड व प्रशिक्षण प्रक्रिया
....................
कोट
‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत कोल्हापूरसाठी विभागीय स्तरावर विभागीय स्पोर्टस् एक्सलन्स सेंटर मंजूर आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत काहीच सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यवाही काहीच झालेली नाही.
- माणिक पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कोल्हापूर विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.