काजूचा कमोडिटीत समावेश केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर

काजूचा कमोडिटीत समावेश केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर

Published on

लोगो ः सकाळ विशेष

काजू
कमॉडिटीचा वायदा;
शेतकऱ्यांना फायदा

काजू एक कमॉडिटी असून, जागतिक व्यापारावर काजूचे आयात-निर्यात, दरांच्या चढ-उतरणीचे पडसाद उमटतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आणि संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील काजू उत्पादकांनाही जागतिक व्यापाराची नोंद घ्यावीच लागते. सर्व काजू उत्पादकांसाठी १३ व्या नव्या कमॉडिटीला वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि ‘सेबी’ने मान्यता दिली. याचा फायदा इथल्या काजू उत्पादकांना नक्की होईल; मात्र काजूला वायद्यांचे व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी उत्पादन, व्यापार पद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वायदे बाजाराची ही संधी साध्य करावी लागेल.
-अमोल सावंत
---
आंब्यापेक्षा काजू हाच पर्याय
आंब्याचे पीक हमखास येईल. यातून पैसे मिळतील, हे कुणीही सांगू शकत नाही. हवामान बदल, अवेळी पडणारा पाऊस, गारपीठ, उष्माघाताची लाट, आंबेगळ, मोहोर तयार झाल्यानंतर विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे खात्री नाही. आंब्याच्या लागवडीतून आठ वर्षांनंतर उत्पन्न मिळते. यासाठी कोल्हापूरसह तळकोकणामध्ये आंबा उत्पादक शेतकरी आंब्याला पर्याय देण्यासाठी काजू क्षेत्राकडे वळत आहेत. काजूचे तीन वर्षांत उत्पादन सुरू होते. लागवड, खते, कीटकनाशके, निगा, आदी खर्च आंब्यापेक्षा कमी येतो. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गात काजू क्षेत्रात गतीने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे काजू क्षेत्र १४ हजार ८७३ हेक्टर असून, तळकोकणापेक्षा ते कमी आहे; पण येणाऱ्या काळात ते वाढविता येईल. यासाठी इथल्या शेतकऱ्यांना केंद्र अन्‌ राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा लागेल.

मूठभर लोकांकडेच नियंत्रण
काजू बीसाठी चांगला भाव मिळावा, ही दरवर्षी उत्पादकांची मागणी असते. ही मागणी अनेकदा पूर्ण होत नाही. काहीवेळा काजू उत्पादन वाढते, तेव्हा किमतीवर दबाव येऊ लागतो. चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागांत सर्वाधिक काजूगर प्रोसिंसग युनिट आहेत. म्हणजे स्थानिक काजू बी, तिथल्या तिथे प्रोसेसिंग करून मिळत आहे. त्यामुळे काजू बी प्रोसेसिंगकरिता बाहेरील राज्यात, जिल्ह्यात न जाता येथेच होत असल्याने वाहतूक आणि अन्य खर्च बाजूला केला तर आम्हा उत्पादकांना दर द्यायला काहीच हरकत नाही; पण मूठभर लोकांकडेच या काजूचे नियंत्रण आहे. ‌

वायदे बाजाराकरिता गोदामांचे जाळे हवे
स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधांतर्गत साठवणूक, डिलिव्हरीसाठी उत्तम दर्जाचे गोदामांचे जाळे कोल्हापूर जिल्ह्यात अन्‌ तळकोकणात उभे करावे लागेल. यासाठी शासनाकडून अर्थसाह्य घ्यावे लागेल. स्थिर भावात कच्चा माल हा व्यापारी, प्रक्रियादारांना लागतो, त्याप्रमाणे काजूगराला योग्य भावही लागतो. हंगाम सुरू झाला की, काजूची किंमत कमी असते. अशावेळी पुढील काळांसाठी वायदे हे साधारण आठ ते दहा टक्के रक्कम देऊन वस्तूंच्‍या व्यापारविषयक व्यवहाराच्‍या ठिकाणावरून (कमॉडिटी एक्स्चेंज) घेता येतील. दर चांगला असताना येणाऱ्या काळात अपेक्षित उत्पादन हे वायद्यांच्या माध्यमातून विकून किंमत निश्चिती करता येते. नवीन हंगाम सुरू होण्याआधी काजू बियांचे वायदे चांगला भाव दाखवतात. अशावेळी उत्पादकांना येणारे उत्पादन वायदे बाजारात विकून योग्य भाव निश्चित करता येतो, म्हणजे हंगामात किंमत पडली तरी उत्पादकाला वायद्यात आधी निश्चित केलेला भाव मिळेल.
...

कोट
कमॉडिटी बाजारात काजूचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळण्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव ठिकाण आहे. शेतकऱ्यांना आयात-निर्यात दराचा फायदा मिळावा, यासाठी अर्थ मंत्रालयाने उचलेले हे पाऊल स्वागतार्ह आहे.
- गौतम पोवार, गुंतवणूक तज्ज्ञ

कोट
शेतकऱ्यांसाठी हा एक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. काजूचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर समजतील. उलाढाल वाढेल. व्यवहारात सुसूत्रता येईल. दरातील फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
- अनिल पाटील, प्रवर्तक, एसपी वेल्थ

कोट
‘काजूची बी वाळविण्यासाठी काही शेतकरी दोन किंवा तीन उन्हे देतात. बी चांगली वाळते. टिकून राहते. मग, ते माल भरून ठेवतात. ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान व्यापाऱ्यांना माल देतात. दराचे गणित शेतकऱ्यांना समजू लागले आहे. दसऱ्यापर्यंत आपल्याकडील काजू माल कारखान्यात वापरला जातो. यानंतर मार्चनंतर देवरुख, टांझानिया आदी भागांतून काजू मागवला जातो.
- मंगल नादवडेकर, चिमणे (ता. आजरा)

ठळक चौकट
जिल्ह्यातील काजू क्षेत्र
*काजू उत्पादित गावे : चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी
*वयानुसार उत्पादन : ५, १०,१५ वयाची झाडे अधिक
*एकूण काजू क्षेत्र : १४ हजार ८७३ हेक्टर
*तीन वर्षांची नवीन झाडे : २० टक्के
*उत्पादनक्षम झाडे : ८० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com