गड- सामानगड वणवा

गड- सामानगड वणवा

Published on

सामानगडावर खडा पहारा देण्याचा निर्धार
वणवा प्रतिबंधासाठी जिद्दीने लढणार : घटनेच्या मालिकेने हळहळले पर्यावरणप्रेमी

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : येथील ऐतिहासिक सामानगडावर दोन दिवसांपूर्वी पेटलेल्या वणव्याने परिसरातील जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. ३-४ वर्षांपासून सततच्या वणव्याच्या या मालिकेने पर्यावरणप्रेमी हळहळले. आता प्रबोधनासह शासकीय यंत्रणा कार्यतत्पर करण्यावर पर्यावरणप्रेमींचा प्रयत्न असून, वणवा प्रतिबंधासाठी जानेवारीपासूनच गडाच्या परिसरात खडा पहारा देण्याचा निर्धार केला आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडे खास कर्मचारी नियुक्तीसाठी पाठपुरावा करण्याचाही निर्णय घेतला आहे.
वणवा लावण्याच्या विकृत मानसिकतेविरुद्ध दुर्गवीरचे मावळे व पर्यावरणप्रेमींनी जिद्दीने लढण्याचा निर्धारही केला आहे. दरवर्षीच्या वणव्यातून सुटकेसाठी गडाच्या लगतचे ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि पर्यावरणप्रेमींची मोट बांधण्याचा प्रयत्न होणार आहे. किल्ल्याच्या गतवैभवासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानने गड संवर्धनाचा यज्ञ, तर विविध योजनांतून लावलेली झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी वणव्यात होरपळलेल्या झाडांसाठी ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन वर्षे माझं गडहिंग्लज ग्रुपच्या माध्यमातून व पर्यावरणप्रेमींच्या मदतीने टँकरने पाणी दिले. सामानगडाच्या सर्वंधनासाठी ‘सकाळ’ने नेहमीच पाठबळ दिले आहे. वणव्याच्या घटनेने अनेकांनी दूरध्वनीद्वारे ‘सकाळ''कडे याला अटकाव करण्‍यासाठी जागरूकतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी वैयक्‍तिक आणि संस्थास्तरावर पुढाकार घेणार असल्याची ग्वाही दिली. शेजारच्या गावांमध्‍ये प्रबोधनासह विकृत मानसिकतेवर नजर ठेवण्यासाठी जागर मांडणार असल्याचे प्रतिष्ठानचे दीपक जगदाळे यांनी सांगितले. वनविभागानेही अधिक काटेकोरपणे काम करण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा दबाव गट करण्‍याची आवश्यकताही अनेकांनी बोलून दाखविली.

चौकट...
यात्रा आणि वणवा....
सामानगडावरील मारुती देवाची यात्रा दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला असते. अलीकडील काही वर्षांतील वणव्यांचा आढावा घेतला तर हे वणवे यात्रेच्या दरम्यानच लागले आहेत. यात्रेला हजारो जण येतात. त्यांच्यासह विकृत मनोविकृतीकडूनही हा वणवा लागत असल्याचा संशय आहे. त्यामुळेच भविष्यात यात्रेच्या दरम्यान अधिक सजग राहावे लागेल. तरच गडावरची हिरवाई टिकून राहू शकेल.

चौकट
यासाठी होणार पाठपुरावा
- सामानगडावर मोक्याच्या ठिकाणी अधिक फलक
- गडालगतच्या गावातील ग्रामस्थांमेध्‍य प्रबोधन
- नोव्हेंबर महिन्यातच काढावी जाळ रेषा
- उन्हाळ्यात वनविभागातर्फे पहारा
- सरपंच परिषद मोहिमेच्या धर्तीवर वणवा रोखण्याच्या उपाययोजना

कोट
सामानगडावरील वणव्याबाबत अधिक दक्षता हवी म्हणून वनविभागाच्या तालुक्यापासून राज्याच्या मुख्य कार्यालयापर्यंत अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली; पण दुर्दैवाने उदासीन धोरणामुळे वणव्यांचे सत्र कायम आहे. यापुढे स्थानिकांना घेऊन वणव्याविरोधात वर्षभर पाठपुरावा व प्रबोधनाचा प्रयत्न आहे.
- बाळासाहेब गुरव, पर्यावरणप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com