

उपमुख्यमंत्र्यांचा दौरा फलदायी ठरणार
इचलकरंजीत जीएसटी अनुदानासह प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार; पक्षप्रवेशामुळे घड्याळाची टिकटिक वाढली
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २८ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा वस्त्रनगरीला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः जीएसटी अनुदानाचा प्रलंबित प्रश्न नजीकच्या काळात मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. या संदर्भातील प्रस्तावाला अधिक गती येणार असून इचलकरंजीसह जालना महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. या अनुदान मंजुरीनंतर शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागतील. किंबहुना महापालिका आर्थिक अडचणीतून बाहेर पडणार आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर निस्तेज झालेला इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला या दौऱ्यामुळे बुस्टर डोस मिळाला आहे.
इचलकरंजीतील पवार यांचा दौरा हा पुरेसा वेळ दिल्यामुळे विशेष चर्चेचा ठरला. तीन महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी माजी आमदार अशोक जांभळे यांच्या गटाने शरद पवार गटाला रामराम करीत यावेळी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळविता आले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे अस्तित्वच संपल्यात जमा होते. पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यामुळे व नवीन पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक वाढली असून हा पक्ष पुन्हा एकदा शहरात पाॅवरफुल्ल झाला आहे. किंबहुना पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा रिचार्ज झाले असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असेल. कारण जांभळे गटाची उणीव महाविकास आघाडीला नक्कीच जाणवेल.
महापालिकेत बैठकीसाठी सुमारे तासभर उपमुख्यमंत्री पवार उपस्थित होते. त्यांनी महापालिकेच्या प्रलंबित व नियोजीत प्रस्तावांची माहिती जाणून घेतली. त्याचे पुढे जात या प्रस्तावांच्या कार्यवाहीबाबतही त्यांनी थेट मंत्रालय पातळीवरीलही संबंधित अधिका-यांशी संवाद साधला. विशेषतः महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा महत्वाचा प्रश्न प्रलंबित आहे. पाठपुरावा केल्यानंतरही याबाबत शासन पातळीवर सकारात्मक हालचाली नाहीत. मात्र पवार यांच्या दौऱ्यामुळे प्रस्तावाला गती आली आहे. केवळ इचलकरंजीच नव्हे तर जालना महापालिकेचाही असाच प्रस्ताव प्रलंबित आहे. दोन्ही महापालिकांना तांत्रिक त्रुटी दूर करीत जीएसटी अनुदान देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रस्ताव मंजुरीनतंर इचलकरंजी महापालिकेला आर्थिक बळ प्राप्त होणार आहे. यावेळी महापालिका प्रशासनाला विविध विकासकामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबतही कानपिचक्या देण्यास ते विसरले नाहीत.
---------------
चौकट
दौरा लक्षात राहण्यासारखा
विविध कारणास्तव अनेक मंत्र्यांचे धावते दौरे होतात. ते कधी आले नी कधी गेले हे पण समजत नाही. पण उपमुख्यमंत्री पवार यांचा हा दौरा मात्र इचलकरंजीसाठी पुरेसा वेळ दिल्यामुळे लक्षात राहणार आहे. राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी त्यांनी सुमारे अडीच तास वेळ दिला. यावेळी त्यांनी इचलकरंजीची क्रीडा परंपरा लक्षात घेऊन क्रीडासंकुल मंजूर करण्याची केलेली घोषणा केली आहे. त्यामुळे प्रस्तावित क्रीडा संकुलाला गती मिळणार असून पुढील काळात क्रीडा क्षेत्राला बळकटी मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.