वकिलाकडून कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न - बंदोबस्त

वकिलाकडून कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न - बंदोबस्त
Published on

54158
कोल्हापूर ः येथे प्रशांत कोरटकरवर शुक्रवारी न्यायालय इमारतीत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेऊन नेताना पोलिस कर्मचारी.


वकिलाचा कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न
न्यायालयात इमारतीत प्रकार; यंत्रणेची एकच धावपळ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : पोलिस कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला आज न्यायालयातून पोलिस परत घेऊन जात होते. त्याच्या भोवती पोलिसांचा गराडा होता. त्यातूनही एका वकिलाने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या तळमजल्यातील कॅन्टीनजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी संबंधित वकिलास चपळाईने ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी रुकडीचे माजी उपसरपंच ॲड. अमितकुमार नानासाहेब भोसले (वय ४५, रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांच्यावर शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
दरम्यान, गतवेळी कोरटकरला अटक केल्यानंतरही हल्ल्याचा प्रयत्न केलेले जयदीप शेळके (वय ५५, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर) आज थेट न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून ओढत थेट न्यायालयाच्या बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्यावरही शांतता भंग केल्याचा आणि यापूर्वी दिलेल्या नोटिसीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे. त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, कोरटकरला कोणी मारहाण करू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
सुनावणी सुरू होण्यापूर्वीच सकाळी अकराच्या दरम्यान न्यायालयात आलेले शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेताना त्यांचा शर्ट फाटला. त्याने तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिणामी पोलिसांनी प्रवेशद्वारापासून आत वाहने सोडली नाहीत. समोरील शाळेच्या मैदानावर वाहनांचे पार्किंग करण्यास सांगितले. काही संशयित आरोपींनाही पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. प्रत्येकाची कसून चौकशी केली जात होती. समन्स आहे किंवा तारखेसंदर्भात कागदपत्रे असली, तरच त्यांना प्रवेश दिला जात होता. प्रवेशद्वारापासून ते थेट कोरटकरला ज्या न्यायालयात हजर करायचे होते, तेथेपर्यंत बंदोबस्त होता. न्यायालयाच्या व्हारांड्यातही इतर कोणाला सोडले जात नव्हते.
दरम्यान, प्रचंड बंदोबस्तासाठी शहर उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह अन्य अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. सुनावणी संपल्यानंतर साधारण अर्धा-पाऊण तासांनी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर कोरटकरला न्यायालय इमारतीच्या तळमजल्यातील कोठडीत ठेवले होते. तेथून मागील दरवाजाने बाहेर काढण्यात येणार होते. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या गराड्यातून कोरटकरला बाहेर नेण्यात येत होते. त्याचवेळी दुपारची सुटी झाली होती. कॅन्टीनमध्ये वकिलांची गर्दी होती. तेथून पोलिस कोरटकरला पळवत बाहेर घेऊन जात असतानाच ॲड. अमितकुमार भोसले यांनी शिवी हसडतच कोरटकरचा एकेरी उल्लेख केला. ते त्याच्या अंगावर धावून जातानाच साध्या वेशातील पोलिसांनी त्यांचे तोंड पकडून त्यांना थेट कॅन्टीनमध्ये ढकलत आत नेले. यावेळीही ॲड. भोसले यांनी असल्यामुळे देशाचे नाव बदनाम होते, असेही पोलिसांना सांगितले. यावेळी ॲड. भोसले यांच्या अंगावर काळा कोट नव्हता. काही क्षणात तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी चपळाईने कोरटकरला मागील दरवाजातून पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवले आणि तेथून सहीसलामत बाहेर काढले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. अखेर सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले.
ॲड. भोसले सामाजिक कार्यकर्ते आहेत. रुकडी येथील रेल्वे पूल, पंचगंगा नदी प्रदूषण अशा अनेक सार्वजनिक प्रश्‍नांसाठी त्यांनी आंदोलन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते राजकरणापासून अलिप्त आहेत. त्यांच्या न्यायालयातील वर्तनामुळे ते कोण आहेत, याची चर्चा न्यायालयातील आवारात रंगली होती.

कोल्हापुरी चप्पलचा ढीग
कोरटकरला अटक केल्यानंतर त्याला कोल्हापुरी चप्पल दाखविण्यात आले होते. त्यामुळे आज पोलिसांनी कोल्हापुरी चप्पल घालून येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेशद्वाराजवळच चप्पल काढण्यास भाग पाडले. त्यामुळे चप्पल काढून नागरिक अनवाणी न्यायालयातील कामकाजासाठी जात होते. परिणामी प्रवेशद्वाराजवळ कोल्हापुरी चप्पलचा ढीग दिसत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com