वैद्यकीय शिक्षण

वैद्यकीय शिक्षण
Published on

पुस्तक फोटो
--
ग्रंथालयासाठी दोन हजार पुस्तकांची मागणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करणार दोन कोटींची खरेदी
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण विभागाने एमबीबीएस ते एमडी, एमएसच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्‍ज ग्रंथालय सुविधा दिली आहे. यात यंदासाठी दोन हजार पुस्तकांची मागणी केली आहे. यातून जवळपास दोन कोटींची पुस्तक खरेदी होणार आहे. यातून वैद्यकीय संशोधन व नवीन उपचार तंत्राविषयी अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागाची शेंडापार्क येथे सुसज्ज इमारत आहे. येथे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे थेअरी अभ्यासक्रम होतात. प्रात्यक्षिकासाठी सीपीआर रुग्णालयात विद्यार्थी येतात. याशिवाय वैद्यकीय उच्चशिक्षण अभ्यासक्रमाचे (पदव्युत्तर) एकूण ४५ विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी वैद्यकीय शिक्षणक्रमाची पुस्तके वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहेत. सहा वर्गांसाठी मिळून साडेबारा हजार पुस्तके आहेत. या पुस्तकांची किंमत दोन कोटींपर्यंत आहे. याशिवाय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सध्याच्या व नव्याने जागा वाढवून मिळाल्यास नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पुस्तकांची खरेदी होत आहे. अशी नवीन पुस्तके कोणती असावीत, किती असावीत, याची मागणी विभागप्रमुखांकडून घेण्यात येत आहे.
त्यानुसार आठपैकी सहा विभागप्रमुखांनी पुस्तकांची मागणी केली आहे. यात अध्यापन व अध्ययनासाठी गरज व उपयुक्ततेनुसार पुस्तकांची मागणी आहे.
यातून अंदाजे दोन हजार पुस्तके खरेदीचा प्रस्ताव तयार झाला. त्यासाठी दोन कोटींचा खर्च गृहित धरला आहे. सीपीआर रुग्णालयात रुग्णांकडून विविध नियमित शुल्क जमा (महसूल) होते. त्यातील रक्कम वापरण्याची तयारी सुरू आहे. सीपीआरमध्ये जमा होणारे नियमित शुल्क शल्यचिकित्सक यांच्या अधिकारात आहे. त्यातील रक्कम पुस्तक खरेदीसाठी वापरात येणार आहे. त्यासाठी शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांच्या दोघांच्या मान्यतेने पुस्तकांची खरेदी होणार आहे.
-
कोट
वैद्यकीय महाविद्यालयाकडे एमएस, एमडीच्या आणखी काही जागांसाठी मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या निकषानुसार ग्रंथालयात अद्ययावत पुस्तके असणे गरजेचे आहे, तरच मान्यता मिळते. वैद्यकीय उच्‍चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळण्यासाठी नव्या आवृत्तीची पुस्तके घेणेही आवश्यक आहे. त्यासाठी पुस्तकांची खरेदी होत आहे. यातून कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
- डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

पुस्तक खरेदी
प्रक्रिया पारदर्शी व्हावी
सीपीआरमधील मागील काही निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यातील एक वादग्रस्त ठेकेदाराची सीपीआरमध्ये आजही ये-जा आहे. मंत्र्यांचा निकटवर्तीय अशी ओळख आहे. त्याच्या मध्यस्थीने ठराविक पुरवठादाराकडून पुस्तक खरेदी होऊ नये, सर्व प्रक्रिया नियमात व्हावी, तत्पूर्वी संभाव्य पुस्तक खरेदी कितपत गरजेची हे तपासावे व मागील अनुभव विचारात घेता पुस्तक खरेदी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी आग्रह धरणे अपेक्षित आहे. अशी चर्चा वैद्यकीय शिक्षण विभागात दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com