

67461
गडहिंग्लज : पावसाने उघडीप दिल्याने बैलाने मशागतीची कामे केली जात आहेत. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
बैल, छोट्या ट्रॅक्टरना सुगीचे दिवस
अजूनही जमिनीत ओलावा : पावसाच्या उघडीपीने मशागतीच्या कामांना गती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : पंधरा दिवसांपासून कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाने आता उघडीप दिली आहे. त्यामुळे खोळंबलेल्या मशागतीच्या कामांना गती आली आहे. पण, जमिनीत अजून काहींसा ओलावा आहे. त्यामुळे ट्रॅक्टरने कामे करताना अडचणी येत आहेत. परिणामी, मशागतीच्या कामांसाठी बैल आणि हलक्या वजनाच्या छोट्या ट्रॅक्टरना (पॉवर टीलर) सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.
यंदा वळवाने चांगलीच हजेरी लावली. पण, त्यापाठोपाठ मॉन्सूनपूर्व पावसाने पाठ सोडली नाही. मे महिन्याच्या मध्यात सुरू झालेला पाऊस महिनाअखेरीसच काहीसा थांबला. कधी नव्हे ते बदललेल्या या निसर्गचक्राने शेतकऱ्यांची मोठी अडचण केली. रान तापण्यासाठी अनेकांनी केवळ पलटी मारली होती, तर काही जणांनी तेही केले नव्हते. त्यात यात्रांच्या हंगामामुळे बऱ्याच जणांचे मशागतीच्या कामांकडे दुर्लक्ष झाले होते. मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे ही कामे खोळंबली होती.
तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. एखाद-दुसरी कोसळणारी सर कोसळत आहे. मध्येच आकाश ढगाळ होत असल्याने कडक उन्ह नाही. त्यामुळे मशागतीची कामे करता येतील इतकी घात आलेली नाही. जमिनीत काहीसा ओलावा आहे. त्यामुळे मोठ्या ट्रॅक्टरने काम करताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत बैलांचे औतकाम, छोटी ट्रॅक्टर फायदेशीर ठरत आहेत. त्यांना मागणी वाढली आहे. पण, प्रत्येक गावात त्यांची संख्या अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अजून एक-दोन दिवस उघडीप राहिल्यास मशागतीच्या कामांना चांगली गती येणार आहे.
--
* हक्काच्या कमाईवर पाणी...
मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाला प्रारंभ होण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी शेतात पलटी मारून घेतली होती, तर अनेकांनी त्याकडेही दुर्लक्ष केले होते. आता पावसाने उघडीप दिल्यामुळे पलटी मारलेले शेतकरी थेट सरी सोडत आहेत. त्यामुळे रोटर मारण्याचा खर्च वाचला आहे, तर ज्यांनी पलटीही मारली नव्हती असे शेतकरी थेट रोटर मारत आहेत. वाहनधारक पलटीसाठी साडेतीन हजार रुपये, तर रोटरसाठी तीन हजार रुपये एकरी घेतात. पावसाने बदललेल्या समीकरणामुळे त्यांना हक्काच्या रकमेवर पाणी सोडावे लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.