अमली पदार्थ सेवन विरोधी दिन

अमली पदार्थ सेवन विरोधी दिन

Published on

लोगो- अमली पदार्थ सेवन विरोधी दिन


गोवा, कर्नाटक, ओडिशाच्या
तस्करांची बाजारपेठ बनली कोल्हापूर
गांजा, एमडी ड्रग्ज, कोकेन, अफूचा पुरवठा ः ‘हायप्रोफाईल’ ग्राहक लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः दारू, रिमझिम, फुलचंदची ‘झिंग’ करणारी कोल्हापूरची तरुणाई आता ‘हायप्रोफाईल’ नशेकडे वळल्याचे चिंताजनक चित्र आहे.
‘विकेन्ड’च्या नावाखाली डोंगरातील फार्महाउस बुक करायचे. नशेची शेवटची हद्द पार करत स्विमिंग टॅंकमध्ये दिवसभर डुंबायचे. रात्रभर मोठ्या आवाजात नाचगाण्यांवर धिंगाणा घालायचा. अलीकडे ‘ट्रिपच्या’ नावाखाली सुरू झालेल्या या पार्ट्यांचे पुरवठादारही गोवा, कर्नाटक, ओडिशातून ‘कोल्हापुरात’ दाखल होत आहेत.
गोवा बनावटीच्या मद्यतस्करीच्या कारवायांमुळे कोल्हापूर वारंवार चर्चेत होते; पण सध्या गांजाची मोठी बाजारपेठ म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही गांजा सेवनाचे प्रकार वाढल्याने पालकांची चिंता वाढली आहे. महाविद्यालयीन टप्प्यावर एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्याला त्यातून बाहेर काढणे मुश्किल बनते. जिल्ह्यात गांजा, एम. डी. ड्रग्ज, कोकेन, चरस, अफू सारख्या सर्वच अमली पदार्थांची तस्करी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
कोल्हापूरच्या सीमेलगत कर्नाटक, गोवा राज्यातून गांजा, एम. डी. ड्रग्जची तस्करी होत असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवायांतून उघड झाले आहे.
राजस्थानमधून कामाच्या निमित्ताने आलेले कामगार, हॉटेलमधील वेटर, विद्यार्थी, ट्रक चालकांकडून गांजा, अफू जिल्ह्यात आणला जात आहे. ओडिशा, हैदराबाद, मुंबई, पश्चिम बंगालमधून एम. डी. ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे पसरली आहेत.
--
पोलिसांकडून
कारवाईचा धडाका
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत कोल्हापूर पोलिसांनी दोनशेहून अधिक कारवाया केल्या आहेत. यात गांजा सेवन केलेल्या १५० जणांवर कारवाई झाली. तर विक्री करणाऱ्यांसह २८० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने जवळपास २४२ किलो गांजा, ४६ ग्रॅम एम. डी. ड्रग्ज, ११ ग्रॅम अफू, कोकेन व चरसही पकडले. ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
--
नकारात्मकतेचा परिणाम
करिअरबाबत मुलांवर मोठा दबाव आहे. अभ्यासातील तणाव दूर करण्यासाठी काही मुले व्यसनाचा आधार घेतात. चित्रपटांमधून दाखविली जाणारी झटपट श्रीमंती, हाणामारीचे प्रसंग मुलांवर प्रभाव करतात. मानसशास्त्रानुसार नकारात्मक बाबींचा प्रभाव मुलांच्या मनावर होत असल्याने अशा गोष्टींकडे अधिक कल वाढतो. विशेषतः एकल पालकत्व असलेल्या मुलांत पालकांपेक्षा संगतीतील मुलांचा अधिक परिणाम होऊन गुन्हेगारी कृत्यांकडे पावले वळत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
.....................
पालकांची जबाबदारी महत्त्वाची....
शाळा, महाविद्यालयात मुले जातात अन्‌ संध्याकाळी घरी परततात इतकीच काय ती माहिती पालकांना असणे अपेक्षित नाही. मुले दिवसभर काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत, शाळा-महाविद्यालयाचे तास चुकवून कोठे जातात का? याची विचारणा पालकांनी दररोज केली पाहिजे. अलीकडे मुलांसोबतचा संवाद हरवत चालल्याने मुलांमधील चिडचिडेपणा वाढल्याचे दिसते. मुले पालकांबद्दलचा राग बाहेरील कोणाजवळ तरी बोलून दाखवतात. याचाच गैरफायदा व्यसनी लोकांकडून घेऊन त्या मुलांना व्यसनाकडे वळविण्यासाठी घेतला जातो. पालकांचा मुलांशी निकोप संवादही महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com