

35166
नेसरी ः गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गाच्या रूंदीकरणाचे येथे सुरू असलेले काम. (दिनकर पाटील ः सकाळ छायायित्रसेवा)
..............
रस्ता रूंदीकरणावर प्रशासनाचा हवा ‘वॉच’
गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग ः कोणाचेच नियंत्रण नसल्याने गैरसोयीत भर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गाच्या रूंदीकरण कामासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. नेसरीमध्ये या कामावरून आंदोलनही झाले. नियोजनशून्य कामाचा आरोप करण्यात आला. या कामावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचा परिणाम नागरिकांच्या सोयीवर होत आहे. त्यामुळे आता प्रशासनानेच या कामावर ‘वॉच’ ठेवण्याची गरज ठळक झाली असली तरी या गंभीर प्रश्नावर प्रशासन वेळ काढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गडहिंग्लज-चंदगड हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. नेसरीपर्यंत एका बाजूचे काँक्रिटीकरण संपले आहे. दुसरी बाजू अद्याप मजबुतीच्या कामातच रेंगाळत आहे. सुरुवातीपासूनच कामात गती नसल्याची ओरड नागरिकांची आहे; परंतु ऐकून घेणारे कोणीच नसल्याने नागरिकही मुकाट्याने नियोजनशून्य कारभाराच्या या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच नेसरीकरांचा उद्रेक झाला. वळीव पावसामुळे रस्ता चिखलमय होत आहे. डर्ट ट्रॅकचा अनुभव घेत वाहनधारक जीव मुठीत घेऊनच प्रवास करीत आहेत. नेसरी बसस्थानकाजवळच्या चौकाच्या रूंदीकरणाचा मुद्दाही तसाच आहे. सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनाही बहुतांश ठिकाणी वाऱ्यावर आहेत.
अशा परिस्थितीत धोका वाढला असताना ठेकेदाराकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. यासंदर्भात सोशल मीडियासह वृत्तपत्रांमधूनही आवाज उठविण्यात येत आहे; परंतु त्याचे कोणालाच देणे-घेणे नाही. किमान स्थानिक प्रशासनाने तरी ठेकेदाराला बोलावून सूचना देण्याची गरज असताना त्याबाबतही कार्यवाही होताना दिसत नाही. अखेर जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना बैठक घेण्याची सूचना केली आहे. दरम्यान, दुसरीकडे या रस्त्यावरून प्रवास करताना रोज जीवनमरणाशी संघर्ष करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमदारांकडूनही अजून कोणतीच हालचाल सुरू नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना होणारा गैरसोय लक्षात घेऊन एक दिवस लोकचळवळ उभारण्याची गरजही भासणार आहे. तत्पूर्वीच प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन ठेकेदाराला कामाच्या डेडलाईनबाबत कालबद्ध कार्यक्रम घेण्याची गरज आहे.
...................
चौकट...
नियंत्रण विभागाचेही दुर्लक्ष
हा रस्ता राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे आहे. त्यामुळे कामावरही या विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. अधिकारी कामाला भेट देतात असे सांगितले जात असले तरी ते कधी येतात आणि केव्हा माघारी जातात हेच लोकांना अजून कळालेले नाही. त्यात स्थानिक प्रशासनानेही लक्ष न दिल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामाच्या धर्तीवर आता प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन या रस्ता कामावरील ठेकेदाराकडून कालबद्ध कार्यक्रम घ्यावा अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.