

35672
गडहिंग्लज : काजू उत्पादक शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत बोलताना एकनाथ काळबांडे. याप्रसंगी उपस्थित राजेश चव्हाण, ऋषिकेत शेळके, राजेंद्र गड्ड्यान्नावर, तानाजी देसाई आदी.
-----------------------------
काजूला हेक्टरी तीन लाख भरपाई द्याच
उत्पादकांची प्रांत कार्यालयात बैठक : पीकपाणी नोंदीसाठी आजपासून तीन दिवस शिबिर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : बदललेल्या हवामानामुळे काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हेक्टरी तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. दरम्यान, पीकपाणी नोंद नसल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नयेत यासाठी उद्या (ता.७) पासून तीन दिवस विशेष शिबिर घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे अध्यक्षस्थानी होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका मांडली. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काजूच्या लघुउद्योगातून शाश्वत रोजगार मिळाला आहे. त्यांनाही झळ बसणार आहे. त्यामुळे काजूबाबत कोकणला लागू होणाऱ्या नुकसानभरपाई योजनेत गडहिंग्लज उपविभागाचाही समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी काजू उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला.
विभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, राहुरी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. कराड यांनी पाहणी केली आहे. ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पंचनामे करता येतील; पण बहुतांश शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर काजूची पीकपाणी नोंद नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे ८० टक्के शेतकरी वंचित राहण्याचा धोका तानाजी देसाई यांनी व्यक्त केला. सातबारावर काजू पीकपाणी लावण्यासाठी उद्यापासून तीन दिवस शिबिर घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. काजू उत्पादकांना मिळणारे अनुदान १० वरून ३० रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणीही केली.
गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, सहायक निबंधक अनिता शिंदे, पणन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
.....
चौकट...
शक्तिपीठला पैसा, मग शेतकऱ्यांसाठी नाही...
राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी बैठकीत शासनाच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. काजू उत्पादक शेतकऱ्यांवर गेल्या ५० वर्षांत प्रथमच नुकसानभरपाई मागण्याची वेळ आली आहे. कधी नाही ते आज तो शासनाच्या दारात आला आहे. त्यामुळे आपत्ती समजूनच त्याला नुकसानभरपाई द्या. गरज नसणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी शासनाकडे पैसा आहे, मग काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.