गड-सभापती आरोग्य तपासणी

गड-सभापती आरोग्य तपासणी
Published on

36314
भडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी गरोदर मातांना मार्गदर्शन केले.
-------------------------------
सभापतींनीच केली गरोदर मातांची तपासणी

भडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र : आहार, जीवनशैलीबाबत केले मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : एखादा प्रश्न समोर आला तर तो सोडविण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना, प्रसंगी पाठपुरावा करणे हा प्रचलित शिरस्ता. पण, प्रश्न समोर आल्यानंतर तो लोकप्रतिनिधीने स्वत:च सोडविण्याची घटना तशा दुर्मीळच. अशीच घटना भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नाहीत हे लक्षात आल्यानंतर स्वत: स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या येथील पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण यांनीच गरोदर मातांची आरोग्य तपासणी केली. त्यांना आहार व जीवनशैलीबाबत मार्गदर्शनही केले.
डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी नुकताच सभापतिपदाचा पदभार स्वीकारला आहे. बुधवारी (ता. ८) त्यांनी भडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. सात कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारत उभारली आहे. वर्षभरापूर्वी उद्‍घाटनही झाले आहे. मात्र, या केंद्राला नियमित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मिळालेले नाहीत. तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी व चार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावरच या आरोग्य केंद्राचा कारभार सुरू असल्याचे डॉ. चव्हाण यांना दिसून आले.
दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात हे अभियान राबविले जाते. मात्र, भडगाव केंद्राला स्त्रीरोग तज्ज्ञही जोडून दिलेले नाहीत. त्यामुळे आज सकाळी डॉ. चव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या. त्यांनी उपस्थित असणाऱ्या ३० गरोदर मातांची आरोग्य तपासणी केली. तसेच गरोदरपणात आहार कोणता असावा, कोणती काळजी घ्यावी, जीवनशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोट...
भडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची चांगली इमारत उभारली आहे. मात्र, कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नाहीत. इतर केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ओपीडी सुरू आहे. रुग्णांना पूर्णक्षमतेने सेवा देताना अडचणी येत आहेत. शासनाने या केंद्राला कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी द्यावेत.
- डॉ. प्रतिभा चव्हाण, सभापती,
पंचायत समिती, गडहिंग्लज

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com