

37542
निर्घृण खुनाविरोधात
दानोळीकर आक्रमक
पोलिस ठाण्यावर मोर्चा
दानोळी, ता. १५ ः सोमवारी रात्री व्यावसायिक भरतेश्वर टोपगोंडा यांचे अपहरण करून केलेल्या निर्घृण खुनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा प्रमुख मार्गांवरून जयसिंगपूर पोलिस ठाण्यावर धडकला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांना निवेदन देत नागरिकांनी कारवाईची मागणी केली. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.
यावेळी बालब्रम्हचारी तात्या भैया म्हणाले, “सामान्यान्याचा खंडणीसाठी अमानुष छळ करून खून केला आहे. हा एका कुटुंबावरचा आघात नसून गावाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे.”
यावेळी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात भरतेश टोपगोंडा यांच्या हत्येचा तपास युद्धपातळीवर करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या दिरंगाई व हलगर्जीपणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशीही ठाम भूमिका मांडण्यात आली. पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, खटला जलदगती न्यायालयात चालवून सक्षम वकील उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.
गावात दहशत निर्माण करणाऱ्या नशेखोर प्रवृत्तीविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करून त्यांना हद्दपार करावे, अशी तीव्र मागणी करत, “या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर मोठे जनआंदोलन उभे राहील. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील,” असा इशारा देण्यात आला.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी; फक्त दानोळी नव्हे, तर परिसरातून नशाखोरीचे समूळ उच्चाटन गरजेचे आहे, असे सांगत पोलिसांना ठोस कारवाईच्या सूचना दिल्या.
उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर म्हणाले, ‘‘वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक तपास सुरू आहे. दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. संपूर्ण विभाग नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.’’
दरम्यान सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मूक मोर्चा प्रमुख मार्गावरुन काढला. त्यानंतर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. त्यावेळी सरपंच सुनीता वाळकुंजे, जिल्हा परिषद सदस्या नंदीना कांबळे, पंचायत समिती सदस्या दीपाली होगले, ग्रामपंचायस सदस्य यांच्यासह नागरिक उपस्थीत होते.
चौकट
दानोळी आजही बंद
आज बुधवारी गाव बंद होते. गुरुवारी (ता. १६) गाव बंद ठेवण्यात येणार आहे. घटनेच्या निषेधाची तीव्रता कायम राहण्यासाठी गाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
खूनप्रकरणी दोघांना कोठडी
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथील भरतेश्वर टोपगोंडा यांच्या खून प्रकरणातील दोघांना बुधवारी (ता. १५) जयसिंगपूर न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भरतेश्वर यांचे अपहरण करून पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंगळवारी खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी टिल्लू पवार व राजदीप ताडे या दोघांना अटक केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात उभे करण्यात आले. आरोपींनी कोणत्या हत्याराचा वापर केला आहे, खुनामागे आणखी कोण आहेत का, घटनेनंतर कोठे पलायन केले होते या तपासासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळावी; असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा पाराज-पाटील यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.