

रुग्णवाहिका फोटो
--
‘पीएचसी’च्या रुग्णवाहिकांची थांबली चाके
विमा-पासिंगसाठी निधीच नाही; वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पदरमोड
अवधूत पाटील ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : आरोग्य विभागात रुग्णवाहिका ही अत्यंतिक गरजेची बाब. मात्र, विमा व पासिंग नसल्याने रुग्णवाहिका बंद ठेवण्याची वेळ आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) रुग्णवाहिकांची चाके थांबली आहेत. तालुक्यातील महागाव व मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांची रुग्णवाहिका पासिंग व विमा उतरविलेला नसल्याने बंदच आहे. यामुळे रुग्णांची अडचण होत आहे.
शासनाकडून निधीच मिळत नसल्याने ही वेळ आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पदरमोड करून विमा व पासिंग करून घेतले आहे. शासनाच्या आरोग्य सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे.
आरोग्य विभागाकडून स्वतंत्र निधी नाही दिला जात नसल्याचे वास्तव आहे. पूर्वी रुग्ण कल्याण समितीतून निधी उपलब्ध केला जात होता. मात्र, त्यातून रुग्णवाहिका पासिंग व विमा उतरण्याला मनाई करण्यात आली. त्यानंतर रुग्णांकडून जमा होणाऱ्या शुल्काचा पर्याय अवलंबला. आता शासनाने रुग्णांचे शुल्क माफ केल्यामुळे हा पर्यायही बंद झाला आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. अत्यंतिक गरजेवेळी अन्य केंद्रांची रुग्णवाहिका वापरण्याची वेळ आली आहे. हलकर्णी व कानडेवाडी केंद्रांच्या रुग्णवाहिकांचाही विमा लवकरच संपणार आहे. कडगाव व नूल केंद्रांच्या विम्याची रक्कम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरलेली आहे.
दृष्टिक्षेपात
- गडहिंग्लज तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र - ७
- गावोगावच्या उपकेंद्रांच्या माध्यमातून त्यांचा कारभार
- रुग्णांच्या सोयीसाठी आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिल्या
- प्रसूती, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना त्यांचा चांगला लाभ मिळतो
- रुग्णवाहिकांचे दरवर्षी पासिंग, विमा उतरवावा लागतो
- आरोग्य विभागाकडून स्वतंत्र निधी नाही
--
स्वतंत्र निधी, अथवा...
रुग्णांना अखंडित सेवा द्यायची असेल तर रुग्णवाहिकांचा विमा उतरविण्यासाठी व पासिंग करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अथवा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांसाठी कॅम्प घ्यावा. सर्वच रुग्णवाहिकांचा एकत्रित विमा उतरवावा. तसेच पासिंगही एकाचवेळी करून घ्यावे. असे झाल्यास हा प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.