संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा
Published on

बंगळूर साखळी बॉम्बस्फोटातील
सात दोषींना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा
कारागृहामधूनच दहशतवादी कट रचल्याचा खुलासा
बंगळूर, ता. २२ : बंगळूर शहरातील एका घरात जिवंत ग्रेनेड सापडल्याच्या आणि तुरुंगातूनच दहशतवादी कारवायांचा कट रचल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. २००८ च्या बंगळूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित टी. नासीर याच्यासह सात जणांना प्रत्येकी सात वर्षांची सक्तमजुरी आणि ४८ हजारांचा दंड ठोठावला.
या प्रकरणात नासीर याच्यासह सय्यद सुहैल, मोहम्मद उमर, जाहिद तबरेज, सय्यद मुदस्सीर पाशा, मोहम्मद फैजल रबानी आणि सन्मान खान यांना दोषी ठरवले. हे सर्व आरोपी आधीपासूनच विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी तुरुंगात बसूनच देशातील विविध भागांत दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
एनआयएच्या माहितीनुसार, आरोपींनी विशिष्ट समुदायातील तरुणांना भडकावून त्यांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना प्रशिक्षण देणे, धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि कट्टरतावादी विचारांकडे वळवणे अशा कृत्यांत ते सक्रिय होते.
नासीर याला न्यायालयात नेण्याच्या मार्गातच पळवून नेण्याचा कट रचल्याचेही उघड झाले. या कटाचा सूत्रधार जुनैद अहमद असून, तो सध्या परदेशात पसार आहे. त्याच्यासह ११ आरोपींविरुद्ध एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.
----------
विदेशी महिलेवर कोडगूमध्ये अत्याचार
बंगळूर : वॉशिंग्टनमधील महिलेवर कोडगू जिल्ह्यातील विराजपेट तालुक्यातील कुट्टा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या होमस्टेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी झारखंडमधील वृजेश कुमार आणि घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून होमस्टे मालक विशाल यांना पोलिसांनी अटक केली. दोघांना तीन मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत मिळाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला कुट्टा येथील ‘देवी व्हिला’ या होमस्टेमध्ये मुक्कामाला होती. या दरम्यान आरोपी वृजेश कुमार याने तिला पेयामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळून दिले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडित महिला कोणाशीही संपर्क साधू नये म्हणून होमस्टेतील वाय-फाय सेवा तब्बल तीन दिवस बंद ठेवली, असा आरोप तक्रारीत आहे. तीन दिवसांनंतर पीडित महिलेने म्हैसूरला जाण्याचा बहाणा करून तेथून अमेरिकेतील दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी ई-मेलद्वारे म्हैसूर पोलिसांशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
-----------
उपराष्ट्रपतींचा खर्गे यांना टोला
बंगळूर : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, ‘दहशतवादी आणि दहशतवाद्यांना धाक दाखवणाऱ्यांमधील फरक ते ओळखत नाहीत’, असा टोला आज लगावला. बिदर येथील एका कार्यक्रमात त्यांनी ही टिप्पणी केली. विशेष म्हणजे खर्गे यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे वक्तव्य केले. राधाकृष्णन म्हणाले की, आपल्याला दहशतवादी आणि त्यांना धाक दाखवणाऱ्यांतील फरक समजतो. कधी कधी खर्गे हा फरक ओळखत नाहीत. अन्यथा त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते माझे चांगले मित्र आहेत, असे म्हणत त्यांनी सौम्य शैलीत टीका केली. दरम्यान, तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चेन्नईतील पत्रकार परिषदेत खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांना ‘दहशतवादी’ असे संबोधल्याने वाद निर्माण झाला होता.
-----
कायद्याचा सन्मान करेन ः जी. परमेश्वर
बंगळूर : बेटिंगमध्ये सहभागाचा आरोप झाल्यानंतर न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल्याबाबत गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज प्रतिक्रिया देताना ‘मी कायद्याचा पूर्ण सन्मान करतो’, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, की कबड्डी सामना सुरू असताना गावांमध्ये लोक सहज बोलतात, त्याचप्रमाणे मीही बोललो होतो. कायद्याच्या दृष्टीने ते चुकीचे ठरू शकते; मात्र मी नेमके काय बोललो, यालाही महत्त्व आहे. बेटिंगला प्रोत्साहन दिले, असा आरोप चुकीचा आहे. कायदा जे पाऊल उचलेल, ते मी स्वीकारेन.’’
---------
संकेश्‍वरात माय-लेक नदीत बुडाले
संकेश्वर : येथील शंकराचार्य संस्थान मठासमोरील हिरण्यकेशी नदीत आई व मुलगा बुडाल्याची घटना मंगळवारी (ता. २१) घडली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईने घेतलेली उडी तिच्या जीवावर बेतली. आईचा मृतदेह सापडला तरी मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. अग्निशामक दल, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. लक्ष्मी सुधाकर कुटोळी (वय २७) असे नदीत बुडालेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलगा सुप्रित सुधाकर कुटोळी (९) याचा शोध सुरू आहे. दोघेही संकेश्‍वरातील हनुमाननगरचे रहिवासी आहेत.
००००००००

सिंधुदुर्गात जांभूळ यंदा ३० टक्केच
वैभववाडी : आंबा, काजूनंतर आता जांभूळ पिकाला देखील बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात जांभूळ हंगामाला धिम्या गतीने प्रारंभ झाला असून, यावर्षी केवळ ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादकांसोबत प्रक्रिया उद्योजकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीची २० ते २२ हजार जांभळाची झाडे आहेत, तर काहींनी नव्याने व्यावसायिक जांभूळ लागवड केली आहे. कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये मागणी वाढल्याने गेल्या काही वर्षांत नव्याने २१ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर व्यावसायिक लागवड झाली आहे.
-------
आगोटासाठी महिलांची बाजारात गर्दी
रत्नागिरी ः पूर्वापार चालत आलेल्या आगोट म्हणजेच पावसाळ्यापूर्वीची साठवणुकीच्या तयारीला वेग आला आहे. आठवडा बाजारांमध्ये खरेदीसाठी महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र यंदा पावसाळ्यासाठीच्या सुक्या मासळीचे दर कडाडलेले आहेत. सिलिंडरच्या टंचाईचे सावट असल्याने ग्रामीण भागात लाकडांचा साठा केला जात आहे. सुक्या मासळीचे दर (प्रतिकिलो रुपयात) - सोडे : १,८००, सुरमई : १,५००, बोंबील : ७००, बगी/म्हाकूळ : ७००, बला : ४००. खारा बांगडा : १००(प्रति नग), कोलीम : ३०० (पायली), मांदेली/लेपा/ढोमी : १०० ते २०० रु. (एका वाट्यात १५ ते २० मासे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com